वेटणे, रणसिंगवाडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी उपोषण सुरू

कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेतून वेटणे-रणसिंगवाडी येथील शेतीला पाणी मिळावे .०.१३ टीएमसी पाणी आरक्षित करणे, बोगद्यामध्ये गेट बसवून सोलर पंपाच्या सहाय्याने दोन्ही गावातील पाझर तलाव, बंधारे, ग्रामतळी कायमस्वरूपी पूर्ण क्षमतेने भरणे, रणसिंगवाडी -वेटणे हद्दीतील बोगदयामध्ये वर्षभरासाठी पाणी साठवून ठेवणे याप्रमुख मागण्यासाठी आज सकाळी १० वाजल्यापासून वेटणे व रणसिंगवाडी येथील ग्रामस्थ वेटणे येथील बोगद्याच्या शाफ्टजवळ आमरण उपोषणास बसले आहेत .

    पुसेगाव : कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेतून वेटणे-रणसिंगवाडी येथील शेतीला पाणी मिळावे .०.१३ टीएमसी पाणी आरक्षित करणे, बोगद्यामध्ये गेट बसवून सोलर पंपाच्या सहाय्याने दोन्ही गावातील पाझर तलाव, बंधारे, ग्रामतळी कायमस्वरूपी पूर्ण क्षमतेने भरणे, रणसिंगवाडी -वेटणे हद्दीतील बोगदयामध्ये वर्षभरासाठी पाणी साठवून ठेवणे याप्रमुख मागण्यासाठी आज सकाळी १० वाजल्यापासून वेटणे व रणसिंगवाडी येथील ग्रामस्थ वेटणे येथील बोगद्याच्या शाफ्टजवळ आमरण उपोषणास बसले आहेत . या उपोषणाला दोन्ही गावातील बहुसंख्येने शेतकऱ्यांनी हजेरी लावली आहे . याबाबत दोन ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

    आज सकाळी १० वाजता वेटणे, रणसिंगवाडी येथील ग्रामस्थ एकत्र येवून वडजाई देवीचे दर्शन घेऊन गावातून फेरी काढून बोगद्धावरील शाप्ट येथील उपोषणस्थळी जमा झाले. यावेळी एकच निर्धार, पाणी मिळाल्याशिवाय नाही माघार, वेटणे -रणसिंगवाडी बोगद्यावरील आंदोलनाचा विजय असो, अशा घोषणांनी परीसर दणाणून सोडला. यावेळी वेटणे व रणसिंगवाडी येथील विक्रम नलवडे, संजय नलवडे, रामचंद्र नलवडे, संदिप नलवडे, अजित नलवडे, प्रताप नलवडे, पोपट नलवडे, सोपान गुंजवटे, अनिल रणसिंग, काशिनाथ रणसिंग, सोमनाथ फडतरे हे ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना दोन्ही गावातील ग्रामस्थांनी राजकारण बाजूला ठेवून पाठींबा दिला आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके, सपोनि आशिष कांबळे, मंडलाधिकारी सचिन कर्णे, तलाठी ठोले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की दोन दिवस पाऊस पडत्यामुळे गाव ओढ्यात येणारे पाणी बोगद्यात जात आहे. तर रणसिंगवाडी येथील पाणी बोगदयाद्वारे नवलेवाडी (ता. माण) येथे जात आहे. याची खात्री करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके व सपोनि आशिष कांबळे व शिष्टमंडळ यांनी नवलेवाडी येथील बोगद्याची तेथे जाऊन पाहणी केली असता बोगदयातून पाणी वहात असल्याचे पहावयास मिळाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी उपोषणस्थळी शेतकऱ्यांनी बोगदयासंदर्भात २०वर्षापासून घडलेल्या घटना सांगितल्या. लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेंतर्गत नेर धरणातून आंधळी धरणात पाणी सोडण्यासाठी तयार केलेला बोगदा १३ किलोमीटरचा असून, हा बोगदा वेटणे, रणसिंगवाडी या दोन गावांच्या भूगर्भातून जात आहे. या बोगद्याचे काम २००४ पासून सुरू असून, बोगद्यामुळे दोन्ही गावांच्या हद्दीतील नैसर्गिक जलस्त्रोत, विहिरी, बंधारे, ग्रामतळी व तलावातील पाणी बोगद्यात उतरत आहे. हे पाणी आमच्या दोन्ही गावांच्या हक्काचे असून, या पाणी जाण्यामुळे दोन्ही गावे पूर्णपणे बाधित झाली आहेत. त्यामुळे या गावांना प्रचंड पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. गेली १५ वर्षे आम्ही आमच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करीत आहोत. २४ जानेवारी २००८ रोजी दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी बोगद्याचे काम बंद पाडून जेलभरो आंदोलन केले होते. त्या वेळी ४३१ ग्रामस्थांना अटक करण्यात आली.

    त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन देऊन आमची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर १ फेब्रुवारी २००८ ला पुणे- बंगळूर महामार्गावर वाढे फाटा येथे दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केले होते. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी लेखी आश्वासने देऊन दोन्ही गावांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवल्यामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थ हवालदिल झाले असून, हक्काच्या पाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. यावेळी होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता Strips स्वामी, कनिष्ठ अभियंता देवकुळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. दिवसभरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आण्णा वलेकर व परिसरातील गावातील ग्रामस्थांनी उपोषणास पाठिबा दिला.