विदर्भातील तरुणांचे वाढती बेरोजगारी, अन्नधान्यावरील जीएसटीसाठी आंदोलन, देवेंद्र फडणवीसांच्या घरावर थेट धडक देत वेगळ्या विदर्भाची मागणी

  नागपूर : नागपूरमध्ये विदर्भवादी आक्रमक होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. ऑगस्ट क्रांतीदिनी विदर्भावाद्यांनी विविध मुद्यांवर सरकारला सवाल केला आहे.

  विदर्भवादी आंदोलनकर्ते आक्रमक, देवेंद्रजींच्या थेट घरावर धडक

  वेगळ्या विदर्भ राज्याची आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. तसेच विजदरात घट द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. महिला आंदोलकांचादेखील यावेळी मोठा सहभाग होता. अन्न धान्यावरील जीएसटी विरोधात विदर्भवादी आक्रमक झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर धडक दिली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाच्या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता.

  सरकार न्याय देत नाही

  विदर्भातील तरुणांच्या हाताला काम नाही. मिहान प्रकल्प आणून ठेवला पण त्यात काम नाही. विदर्भावर सतत अन्याय होत आहे. मात्र सरकार न्याय देत नाही, अशी प्रतिक्रिया आंदोलक तरुणांनी दिली आहे.

  पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यात

  सुरुवातील लाँगमार्च काढून आंदोलनकर्ते फडणवीसांच्या घराकडे कूच करीत असताना पोलिसांनी त्यांना मध्ये अडवल्याने वातावरण तापले. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. पोलिसांनी फडणवीस यांच्या घराबाहेर बॅरिकेट्स लावून मोठा बंदोबस्त तैनात केला. परंतु, संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले  बॅरिकेट्स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.