२०२४ पर्यंत अकोला जिल्हा क्षयरोग मुक्त करावा : जिल्हाधिकारी

क्षयरोग हा मायकोबॅक्टेरिम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे.

    अकोला. क्षयरोग उच्चाटनासाठी दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, ही जाणीव ठेवून 2024 पर्यंत जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सज्ज व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रमात बोलताना केले.

    राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय आणि जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बुधवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. वीरेंद्र वानखडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मेघा गोळे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक उपस्थित होत्या.

    क्षयरोग हा मायकोबॅक्टेरिम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. 1882 साली डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला. त्यास 24 मार्च रोजी मान्यता मिळाली म्हणून हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉ. राजकुमार चव्हाण यांनी जिल्ह्यातील रुग्णांची सीबीनेट तपासणी करून एमडीआर रुग्णांना औषधोपचारावर आणून क्षयरोगाचा प्रसार थांबवावा, असे आवाहन केले. जागतिक आरोग्य संघटना सल्लागारांनी प्रत्येक संशयित रुग्णांची सीबीनेट व दृनेट तपासणी करण्यावर भर देण्यात यावा तसेच कोमॉरबीट रुग्णांची लवकरात लवकर क्षयरोगाची तपासणी करून निदान करावे, असे आवाहन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी 2020 मध्ये आपल्या जिल्ह्याने क्षयरोग कार्यक्रमाचे चांगले काम केल्याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

    यावेळी टीबी फोरम, टीबी कोमॉरबीडीटीची सभा घेऊन क्षयरोगाबाबत आढावा घेतला. डॉ. गोळे यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमाच्या आयोजनात राठोड, कपिल होळकर, दर्शन जनईकर, वसंत उन्हाळे, राहुल गावंडे, तेजस्विनी पहुरकर, एच. एम. शेगोकार, शेख ईस्माईल, निंधाणे, उमेश पद्मणे, हेमंत भाकरे, बबेरबार, प्रतीक गाडगे, कोंडबा खुपसे यांचा सहभाग होता. संचालन वसंत उन्हाळे तर आभार जनईकर यांनी मानले.