फटाका फोडल्याच्या वादातून शेजाऱ्याकडून बेदम मारहाण; व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

ताथोडनगर (Tathodnagar) येथील रहिवासी एका इसमाची शेजारीच रहिवासी असलेल्या बहीण व भावाने फटाका का फोडला, असे म्हणत लोखंडी पाइप व रॉडने मारहाण करीत हत्या केल्याची घटना उघडकीस आली. ११ सप्टेंबर रोजी मारहाण केल्यानंतर काही दिवसांतच जखमी असलेल्या सुनील गवई यांचा मृत्यू झाला.

    अकोला (Akola) : ताथोडनगर (Tathodnagar) येथील रहिवासी एका इसमाची शेजारीच रहिवासी असलेल्या बहीण व भावाने फटाका का फोडला, असे म्हणत लोखंडी पाइप व रॉडने मारहाण करीत हत्या केल्याची घटना उघडकीस आली. ११ सप्टेंबर रोजी मारहाण केल्यानंतर काही दिवसांतच जखमी असलेल्या सुनील गवई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी खुनासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

    मोठी उमरी परिसरात असलेल्या ताथोडनगर येथील रहिवासी सुनील लक्ष्मण गवई वय ४२ वर्षे यांनी ११ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांच्या घराच्या अंगणात बसवलेल्या गणपतीसमोर फटाका फोडला होता. याच कारणावरून त्यांचेच शेजारी असलेले वृंदन विष्णू जाधव व त्याची बहीण सकू विष्णू जाधव यांनी दोघांनी लोखंडी पाइपने सुनील गवई यांना बेदम मारहाण केली त्यानंतर गवई जमिनीवर कोसळताच या दोघांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत लोटपाट केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुनील गवई यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले मात्र, येथील सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

    गवई यांच्यावर उपचार सुरू असतानाच तीन दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी सुरुवातीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला होता मात्र गवई यांचा मृत्यू झाल्यानंतर वृंदन जाधव व त्याची बहीण सकू जाधव या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला यासोबतच अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वयेही गुन्हा दाखल काण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी बहीण- भाऊ फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.