सायंकाळी सातनंतर बसेस बंद? एस.टी.च्या अधिका-यांना आदेशाची प्रतीक्षा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्रीपासून राज्यात जमावबंदीची घोषणा केली आहे. यामुळे दळणवळण क्षेत्रावर चांगलाच परिणाम होणार आहे. रात्रीच्या बसेस एस.टी.महामंडळाला बंद कराव्या लागणार आहेत.

  अकोला (Akola).  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्रीपासून राज्यात जमावबंदीची घोषणा केली आहे. यामुळे दळणवळण क्षेत्रावर चांगलाच परिणाम होणार आहे. रात्रीच्या बसेस एस.टी.महामंडळाला बंद कराव्या लागणार आहेत. त्यासाठी नियोजन करायचे तर आदेश अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे सायंकाळी सातनंतर बसेस बंद करण्याच्या विचारात अधिकारी आहेत मात्र त्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशाची प्रतीक्षा सुरु आहे.

  तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आगारातून तशाही सायंकाळनंतर अनेक बसेस धावणे कमी होतात. खेडेगावात पोचायचे तर सायंकाळच्या आत. त्यामुळे प्रवाशी साधारणपणे अंधार पडण्यापूर्वीच गावात पोचण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर तालुक्याच्या ठिकाणावरून सायंकाळी सातनंतर धावणा-या बसेस सर्वात आधी बंद होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जिल्हास्तरावरून रात्री आठ, साडेआठपर्यंत सुरु राहू शकतात. अत्यंत महत्वाच्या कामासाठी बसची मागणी असल्यास क्वचित प्रसंगी बस सोडण्याचीही महामंडळाची तयारी आहे. उदा. एखाद्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जायचे आहे व जाण्यासाठी इतर कोणतेही वाहन उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे शासकीय महत्वाच्या कामासाठी अचानक बस सोडण्यात येऊ शकते.

  अपडाऊन करणा-यांची पंचाईत
  अनेक जण शासकीय तसेच खासगी कार्यालयात अकोला येथे कार्यरत आहेत. दररोज त्यांना ये-जा करण्यासाठी महामंडळाच्या बसचा आधार आहे. मात्र सायंकाळी बस उपलब्ध नसेल तर अपडाऊन कसे करायचे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे अकोला येथून तालुक्याच्या ठिकाणी कामधंद्यानिमित्त ये-जा करणारे अनेक जण आहेत. काही ठिकाणी रेल्वेने अपडाऊन सोयीस्कर होते मात्र सध्या रेल्वेही सोयीस्कर राहिलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊनची प्रवाशांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

  चिंतेचे सावट
  मागील वर्षी लॉकडाऊन सुरु झाले त्यानंतर बसेस काही काळ बंद होत्या. त्या कालावधीत एस.टी.कर्मचा-यांचे वेतन थकले होते. कोरोना काळात एस.टी. कर्मचा-यांना एकेक दिवस बोटावर मोजून काढावा लागला. त्यानंतर आता कुठे लालपरी रस्त्यावर धावू लागली, त्यातही परत रात्रीची जमावबंदी लागू होणार आहे. कडक लॉकडाऊन लागल्यास परत नोकरीवर गदा येण्याची भीती अनेकांना वाटत आहे. रात्रीच्या बसेस बंद झाल्या तर त्याचा वेतनावर परिणाम होऊ नये असे चिंतेचे सावट कर्मचा-यांमध्ये पसरले आहे.

  फेरीवाल्यांवरही उपासमारीची वेळ
  बसस्थानकावर खरमुरे, गोळ्या बिस्कीट, पेन, पुस्तके विकून अनेक जण उदरनिर्वाह चालवितात. त्याचप्रमाणे कॅन्टीन, रसवंती, आईस्क्रीमचे दुकानही अनेक स्थानकावर थाटले आहेत. आता लॉकडाऊन लागले किंवा रात्रीच्या बसेस बंद झाल्या तर त्याचा या सर्व घटकांवर परिणाम होणार आहे. फेरीवाल्यांवर तर उपासमारीची वेळ येणार आहे. बसेसचे आवागमन बंद झाले तर बसस्थानक परिसरातील दुकानेही बंदच राहतील. अनेकांचे आर्थिक व्यवहार ठप्प होतील.