कौटुंबिक वाद विकोपाला पोहोचला; पती-पत्नीला जागीच केलं ठार

    अकोला (Akola) : अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो इथे कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत दोघांची हत्या झाली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो गावातील गिरी परीवारात गेल्या काही दिवसापासून कौटुंबिक वाद सुरु होता. या वादाचे रूपांतर आज हाणामारीत झाले. यात ४२ वर्षीय किशोर गिरी यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर त्यांची पत्नी ३८ वर्षीय दुर्गा किशोर गिरी हिचा अकोल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, यात दुर्गाची आई जिजाबाई निरंजन गिरी हाणामारीत गंभीररीत्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. पोलीसांच्या माहितीनुसार दोन्ही कुटुंबात शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात सैय्यद जाबीर, अर्चना गिरी, बेबी मोहन गिरी व ईश्वर पुरी यांनी धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात किशोर व दुर्गा याच्या डोक्यात लोखंडी सब्बलने व विळ्याने वार केले.

    मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसांनी सैय्यद जाबीर, बेबी गिरी, अर्चना गिरी यांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी ईश्वरच हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. मृतकाचा मुलगा रोहन गिरी याने ग्रामीण पोलीसात फिर्याद दाखल केली तर या घटनेत ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहे.