
एका कार्यक्रमात राज्यातील आघाडी सरकारवर टीका करताना नाभिक समाजाबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. मंत्री दानवे यांच्यावर गुन्हे दाखल न केल्यास नाभिक समाज राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
अकोला : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथील एका कार्यक्रमात राज्यातील आघाडी सरकारवर टीका करताना नाभिक समाजाबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. सकल नाभिक समाजाकडून त्याचा निषेध करण्यात येत आहे. रावसाहेब दानवे यांनी समाजाचा अवमान करून मानवाधिकाराचे उल्लंघन केले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन न्याय द्यावा, या मागणीसाठी समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
श्री संतसेना महाराज बहुउद्देशीय सेवा समिती व नाभिक दुकानदार संघटना, बोरगाव मंजू यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की एखाद्या राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने जाहीर सभेमध्ये एखाद्या समाजाच्या पारंपरिक व्यवसायाबद्दल अवमानजनक वक्तव्य करणे म्हणजे समाजास दुय्यम वागणूक देणे होय. तरी, मंत्री दानवे यांच्यावर गुन्हे दाखल न केल्यास नाभिक समाज राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नाभिक समाज बोरगाव मंजूचे अध्यक्ष संजय राजनकर, उपाध्यक्ष रोहन खापरकर, सचिव प्रवीण आंबूलकर, सहसचिव ऋषिकेश पळसकर, नारायण निंबोकार, अक्षय खापरकर, अशोक खिरेकर, सोपान खापरकर, गोपाल निंबोकार, सदानंद निंबोकार, निवृत्ती खिरेकर, निवृत्ती भातुळकर तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.