High court mediation resolves issue, finally clears way for Murtijapur court building!

कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूर्तिजापूर न्यायालयाच्या नूतनीकरणाच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल किलोर यांच्या पुढाकाराने तसेच उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या अथक प्रयत्नाने मूर्तिजापूर एमआयडीसी स्थित सर्वे नंबर १४९ येथील ५ एकर जागा देऊन त्यावर काही दिवसात प्रशस्त नवीन न्यायालयाची इमारत उभारणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

    मूर्तिजापूर : येथे न्यायालयाची नवीन प्रशस्त इमारत निर्माण करण्याचा मार्ग अखेर उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीने मोकळा करण्यात आला. कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूर्तिजापूर न्यायालयाच्या नूतनीकरणाच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल किलोर यांच्या पुढाकाराने तसेच उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या अथक प्रयत्नाने मूर्तिजापूर एमआयडीसी स्थित सर्वे नंबर १४९ येथील ५ एकर जागा देऊन त्यावर काही दिवसात प्रशस्त नवीन न्यायालयाची इमारत उभारणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

    सध्या मूर्तिजापूर न्यायालयाची इमारत न्यायालयाच्या कामकाजाकरिता कमी पडत असल्याने येथील वकील संघाच्या वतीने नवीन इमारतीच्या बांधकामाकरिता मागणी केली जात होती. प्रशासनाच्या वतीने पूर्वी राष्ट्रीय महामार्ग ६ वरील हेंडज नजीक जागा दाखविण्यात आली होती,  येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नरेंद्र काळे यांनी यासाठी अनेक आंदोलने, उपोषणे केली तसेच कागदोपत्री पाठपुरावा केला. मूर्तिजापूर नगर परिषदेच्या सभागृहात वकील संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, जिल्हा न्यायमूर्ती खोब्रागडे, न्यायमूर्ती जी. जी. कांबळे, न्यायमूर्ती कुरेशी, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विजय लोकरे, तहसीलदार प्रदीप पवार, अकोला जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. वानखडे, ॲड. बी के गांधी, अॅड. मोतीसिंग मोहता आदि मान्यवरांच्या उपस्थितीत मूर्तिजापूर एमआयडीसी स्थित सर्वे नंबर १४९ ची जागा मूर्तिजापूर न्‍यायालयाच्‍या नवीन इमारतीकरिता प्रशासनाच्या वतीने सुनिश्चित करण्यात आली.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांचे ॲड. विठ्ठल गौरखेडे, ॲड. शरद मेहरे, प्रशांत भडांगे आदिंनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मूर्तिजापूर नगरपरिषदेची पीएम पुरस्काराकरिता निवड झाल्याबद्दल नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय लोकरे यांचा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती जी. जी कांबळे व न्यायमूर्ती कुरेशी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.