दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ आंदोलन, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय

दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर दिनांक 25 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीमध्ये दुग्ध विकास मंत्री श्री. सुनील केदार यांना हजारो पत्र पाठवण्याचे आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येईल असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. लेटर टू डेअरी मिनिस्टर या मोही मे अंतर्गत दूध संकलन केंद्रावर दूध घालण्यासाठी जमलेले शेतकरी एकत्र बसून हे पत्र लिहितील व दुग्धविकास मंत्र्यांना पाठवतील. दुग्ध विकास मंत्र्यांनी आंदोलकांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देतील.

    दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या राज्य समन्वय समितीची विस्तारित ऑनलाइन बैठक दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 8 वाजता संपन्न झाली. दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी राज्यभर संपन्न झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दूध आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

    दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर दिनांक 25 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीमध्ये दुग्ध विकास मंत्री श्री. सुनील केदार यांना हजारो पत्र पाठवण्याचे आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येईल असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. लेटर टू डेअरी मिनिस्टर या मोही मे अंतर्गत दूध संकलन केंद्रावर दूध घालण्यासाठी जमलेले शेतकरी एकत्र बसून हे पत्र लिहितील व दुग्धविकास मंत्र्यांना पाठवतील. दुग्ध विकास मंत्र्यांनी आंदोलकांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देतील.

    बैठकीसाठी अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व गुजरात येथील ज्येष्ठ शेतकरी नेते दायाभाई गजेरा यांचे मार्गदर्शन लाभले. उमेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी समितीच्या कार्याचा अहवाल सादर केला तसेच आगामी वाटचालीसाठी करावयाच्या कार्याचा प्रस्ताव मांडला.

    सदोष मिल्को मिटर वापरून फॅट व एस. एन. एफ. कमी दाखवून शेतकऱ्यांना लुटण्याचे उद्योग महाराष्ट्रात राजरोसपणे सुरू आहेत. दूध उत्पादकांच्या या लुटमारीची गंभीर दखल संघर्ष समितीने घेतली असून आगामी काळात याबाबत राज्यभर अभियान चालविले जाईल असा निर्णय घेण्यात आला.

    संघर्ष समितीने यापूर्वी दुधाला एफ.आर.पी., रेव्हेन्यू शेअरींग, भेसळ मुक्ती यासह 8 मागण्या निश्चित केल्या होत्या. बैठकीत माजी कुलगुरू डॉ. अशोक ढगे यांच्या सूचनेनुसार, राज्यात दूध मूल्य आयोग स्थापन करावा ही मागणी आंदोलनात सामील करण्यात आली.

    वर्गीस कुरीयन यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरातमध्ये झालेल्या दुग्ध क्रांतीची काही चांगली फळे त्या ठिकाणचे शेतकरी आज चाखत आहेत. एक राज्य एक ब्रँड आणि मजबूत सहकार याच्या जोरावर लॉकडाउनच्या काळातही या शेतकऱ्यांना प्रति लिटर तीस रुपयाचा दर देण्यात आला. महाराष्ट्राच्या तुलनेने आजही गुजरातचे दूध उत्पादक शेतकरी अधिक दर घेत आहेत.

    शेती नावावर नसणारे भूमिहीन शेतमजूरही त्याठिकाणी यशस्वी दूध व्यवसाय करत आहेत. गुजरातमध्ये होत असणाऱ्या या सर्व प्रयोगांची माहिती महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना करून देण्यासाठी दूध उत्पादकांचे गुजरात येथील नेते दायाभाई गजेरा यांना बैठकीमध्ये खास करून बोलावण्यात आले होते. दायाभाई गजेरा यांनी गुजरात मॉडेलची माहिती महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समन्वय समितीतील उपस्थित नेत्यांना दिली.

    उदय नारकर, सिद्धपा कलशेट्टी, सतीश देशमुख, डॉ. अशोक ढगे, रामनाथ वदक, जोतिराम जाधव, रामकुमार जोरी, धनंजय धोरडे, दादा गाढवे, सुहास रंधे आदींनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.