२ चिमुकल्यांना घेऊन दळणासाठी गेली, संध्याकाळी आईसह मुलांचेही मृतदेह विहिरीत सापडले

    अकोला (Akola) : अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चांगेफळ येथील विवाहित महिलेची आपल्या पोटच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली. यामुळे चांगेफळ परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.

    आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव ( पूजा गजानन काळे, वय वर्षे २८) मुलगी (तनु गजानन काळे, वय वर्षे ८ ) आणि( आठ महिन्याचा लहान मुलगा स्वामी गजानन काळे,) असे तिघे मृतकाचे नाव आहे.

    मृतक विवाहित महिला सोमवार रोजी दुपारी पीठगिरणी वरून दळण आणण्याचे कारण सांगून एक मुलगी आणि एक मुलगा असे आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घरून निघाली होती. परंतु सायंकाळही झाली पण ती घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता, चांगेफळ शेतशिवारातील विहिरीत विवाहित महिला आणि मुलगी तसेच चिमुरडा लहान मुलगा असे तिघांचे मृतदेह त्या विहिरीत तरंगताना आढळून आले.

    या घटनेमुळे चांगेफळ या गावा सोबतच आजूबाजूच्या परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. आत्महत्या केलेल्या महिलेबद्द्ल आणि तिच्या दोन्ही चिमुकल्यांबद्दल हळहळ व्यक्त करत महिलेने इतकं टोकाचं पाऊल का उचललं अशा चर्चांना उधाण आलं होतं. सदर घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, उपनिरीक्षक गणेश नावकार, सहाय्यक उपनिरीक्षक बाळकृष्ण येवले, आदिनाथ गाठेकर, विलास नाफडे, आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि पंचनामा केला आणि तिघाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले. तर पुढील तपास ठाणेदार राहुल वाघ करीत आहे.