फिरत्या वाहनाद्वारे स्वॅब संकलन; विभागीय आयुक्तांनी दाखविली हिरवी झेंडी

ग्रामीण भागातील रुग्ण व मृत्यूसंख्या वाढ तसेच लसीकरण मोहिमेचा त्यांनी आढावा घेतला. लस उपलब्धतेची माहिती घेऊन शहरी व ग्रामीण भागात लक्ष केंद्रीत करावे. लसीकरणाबाबत गैरसमज दूर करून मोहीम राबवण्याची...

  अकोला. कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या फिरत्या वाहन पथकाद्वारे विविध ठिकाणी जाऊन नागरिकांचे कोविड चाचणी नमुने संकलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

  यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा उपायुक्त पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार उपस्थित होते.

  कोरोना विषाणूचा फैलाव कमी व्हावा यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आवश्यक असून महापालिकेच्या फिरत्या वाहनाद्वारे शहरातील चारही झोनमधील गर्दीच्या ठिकाणी तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी जाऊन लोकांचे स्वॅब संकलन करणार आहे. जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.

  विभागीय आयुक्तांकडून कोविड स्थितीचा आढावा

  कोरोना विषाणू संसर्गाची सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत  विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला. कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून काटेकोरपणे उपाययोजना कराव्या. तसेच कोरोना विषाणूचा धोका कमी करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले.

  जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, जिपचे सीईओ सौरभ कटियार, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, मनपा उपायुक्त पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, डॉ. एम. डी. अष्टपुत्रे, डॉ. एन. ए. अंभोरे उपस्थित होते.

  ग्रामीण भागातील रुग्ण व मृत्यूसंख्या वाढ तसेच लसीकरण मोहिमेचा त्यांनी आढावा घेतला. लस उपलब्धतेची माहिती घेऊन शहरी व ग्रामीण भागात लक्ष केंद्रीत करावे. लसीकरणाबाबत गैरसमज दूर करून मोहीम राबवण्याची सूचना त्यांनी केली. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तीच्या हातावर शिक्के मारून होम आयसोलेशनच्या ठिकाणी स्टिकर लावून प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे. नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.