तापमानात होतेय दिवसेंदिवस वाढ; विदर्भात उन्हाचा चटका वाढतोय

दरवर्षी विदर्भाच्या अनेक भागांमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेची जणू लाटच येत असते. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच सूर्याने आग ओकण्यास सुरूवात केली आहे.  विदर्भातील बहुतेक सर्वच जिल्हयांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये 40 अंशावर तापमानाची नोंद करण्यात आली.

    अकोला (रूबेन वाळके). जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाच सोमवारपासून अकोलेकरांना उष्णतेने झोडपणे सुरू केले आहे. सध्या तापमानाने चाळीशी ओलांडली असून, कोरोनासोबतच उष्माघात या दुस-या जीवघेण्या आजाराचा धोकाही वाढत चालला आहे. दरम्यान, या आजारामध्ये शरीराचे तापमान वाजवीपेक्षा जास्त म्हणजे 102 फॅरनहाईट किंवा त्यापेक्षा जास्त झाल्याने अवयवांना इजा पोहोचून, ग्लानी येवून रूग्ण बेशुद्ध पडल्यास आणि त्याला वेळीच उपचार न मिळाल्यास मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चौहान यांनी केले आहे.

    दरवर्षी विदर्भाच्या अनेक भागांमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेची जणू लाटच येत असते. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच सूर्याने आग ओकण्यास सुरूवात केली आहे.  विदर्भातील बहुतेक सर्वच जिल्हयांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये 40 अंशावर तापमानाची नोंद करण्यात आली. सोमवार आणि मंगळवारी अकोल्यात 41 अंशांच्यावर तापमान नोंदविले गेले.  आता हळूहळू तापमानात वाढ होऊ लागल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. यापूर्वी 73 वर्षांपूर्वी 22 मे 1947 रोजी अकोल्यात 47.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते.