पैसे मोजण्याचा बहाणा केला अन् महिलेचे 13 हजार रोख घेऊन पोबारा केला; अमरावतीतील घटना

बँकेतून पैसे काढून निघालेल्या महिलेला एका युवकाने अडविले आणि त्यांचे पैसे कमी निघाल्याचे सांगून तो पुन्हा तिला बँकेत घेऊन गेला. तिथे पैसे मोजण्यास मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याजवळील सर्व रक्कम घेऊन तो पसार झाला.

    अमरावती : बँकेतून पैसे काढून निघालेल्या महिलेला एका युवकाने अडविले आणि त्यांचे पैसे कमी निघाल्याचे सांगून तो पुन्हा तिला बँकेत घेऊन गेला. तिथे पैसे मोजण्यास मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याजवळील सर्व रक्कम घेऊन तो पसार झाला. ही घटना श्याम चौकातील बडोदा बँकेच्या परिसरात घडली.

    या महिलेने बँकेत स्लीप भरून कॉउंटरवरून 13 हजार रुपये काढले. त्यानंतर ती महिला घरी जाण्यासाठी ऑटो शोधण्यासाठी गेली. त्यावेळी तिच्या मागे जाऊन सदर अनोळखी युवकाने त्यांना अडविले. तसेच 500 रूपयांच्या नोटा दाखवून तुमचे पैसे कमी निघाले काय, असा प्रश्न करून महिलेला संभ्रमात टाकले. त्यानंतर सदर महिलेला घेऊन तो युवक बँकेत गेला. तिथे एका बाकावर महिलेला बसवून पैसे पुन्हा मोजून घेण्यास सांगितले. त्यावेळी पैसे मोजण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने त्याने ते पैसे एका पिशवीत टाकले.

    तसेच महिलेला पुन्हा एक स्लीप भरायला लावली. तेवढ्या वेळात तो पैशांची पिशवी घेऊन पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.