फडणवीसांनी ‘हे’ स्वतः मान्य केलं आहे; यशोमती ठाकूर यांचा पलटवार

    अमरावती (Amaravati) : त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. यात अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी अमरावतीतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्य सरकारवर व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेवर यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर टीका केली आहे. १२ च्या घटनेवर काहीच कारवाई नाही. त्यावर कोणताही नेता बोलत नाही. पालकमंत्री यशोमती ठाकूरही बोलत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. अपूर्ण व अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगायला हवा, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

    देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर यशोमती ठाकूर यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अमरावती तणावासंदर्भात दोन्हीकडच्या लोकांवर कारवाई होत आहे. अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगायला हवा. आपल्याकडून शांततेचं आवाहन अपेक्षित असताना, वातावरण भडकवण्याचाच प्रयत्न दिसत आहे. १२ तारखेची घटना चुकीची होतीच त्यांचं कोणीच समर्थन केलेले नाही. तसंच १३ तारखेची घटना चुकीची होती, असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही मान्य केलेले आहे, या परिस्थितीत शासन योग्य कारवाई करत आहे. महाराष्ट्रात शांतता राहावी म्हणून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे,’ असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.