
सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजावलं आहे. आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर मुंबईतील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रार देखील केली होती. दरम्यान या पार्श्वभूमीवर ईडीने अडसूळ पिता-पुत्रांना समन्स बजावलं आहे.
अमरावती : सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजावलं आहे. आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर मुंबईतील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रार देखील केली होती.
दरम्यान या पार्श्वभूमीवर ईडीने अडसूळ पिता-पुत्रांना समन्स बजावलं आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी खासदार अडसूळ यांच्यासह मुलगा आणि जावयाच्या घरांवर ईडीचे छापे पडले होते. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार करत सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम आणि गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.
मात्र, हे आरोप खासदार अडसूळ आणि त्यांच्या मुलाने फेटाळून लावले आहेत. आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी एका मराठी माध्यमाशी बोलताना आमदार रवी राणा यांच्यावर गंभीर आरोप केले. या प्रकरणाशी संबंधित माहिती रवी राणा यांनी पेरली आहे. सुरुवातीला अटक झाल्याची बातमी पसरवली. मात्र, अटक झालेली नाही, असं अभिजीत अडसूळ म्हणाले. रवी राणा यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पैशांच्या, राजकीय दबावाखाली ठेवलं आहे, असा आरोप अभिजीत अडसूळ यांनी केला.
सिटी बँकेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार सर्वप्रथम आनंदराव अडसूळ यांनी एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तसंच आर्थिक गुन्हे शाखेमध्ये जाऊन तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी कशाप्रकारे आणि कोणी कोणी घोटाळा केला आहे, याचा उल्लेख केला आहे, असं अभिजीत अडसूळ यांनी सांगितलं.