जामतारा पॅटर्नच आता उठलाय पोलिसांच्या मुळावर; आता थेट त्यांनाच जाळ्यात ओढण्याचा होतोय प्रयत्न

मोनिका यांच्या फेसबुक अकाउंट वरून पैशांची मागणी होत असल्याचे समोर आले. या घटनेने पोलीस कर्मचारी असलेल्या मोनिका इंगळे व त्यांचे पती चेतन घोगरे यांनी तात्काळ परिवारातील ग्रुपवर आपलं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची कल्पना दिली व कुणीही पैसे न टाकण्याचे आवाहन केले.

    अमरावती : ऑनलाइन सायबर गुन्हेगारीत प्रचलित असलेला ‘जामतारा पॅटर्न’ सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाइन भूल देत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. मात्र आता या जामतारा पॅटर्नच्या निशाण्यावर अमरावती जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

    जिल्ह्यात एकाच महिन्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले. सायबर चोरटे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी संबंधित मित्र व नातेवाईकांकडून पैशांची मागणी सुद्धा केली आहे. यात अनेकांचे नातेवाईक व मित्र परिवारातील सदस्य बळी पडल्याने अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाइन आमिष देत डिजिटल पाकीटमारी करणाऱ्या चोरट्यांच्या निशाण्यावर जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी आल्याचे समोर आले आहे.

    अमरावती ग्रामीण पोलीस दलातील महिला कर्मचारी मोनिका इंगळे-घोगरे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट काढून सायबर चोरट्याने त्यांच्या नावे नातेवाईकांकडून पैसे उकळत असल्याचा प्रकार शनिवारी समोर आला. मोनिका इंगळे या रहिमापुर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. त्यांचे सासरे करोना आजाराशी झुंज देत आहेत. परतवाडा येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात औषधोपचार सुरू आहेत.

    खरं गौडबंगाल असं आलं समोर

    दरम्यान, सायबर गुन्हेगारांनी मोनिका इंगळे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट काढून नातेवाईकांकडे पैशांची मागणी केली. नातेवाईकांनी पैसे देण्यास होकार दर्शविला. मात्र नातेवाईकांकडे ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्याची कुठलीही सोय नसल्याने नातेवाईकांनी मोनिका इंगळे यांचे पती चेतन घोगरे यांना कॉल करुन पैसे कुठल्या खात्यावर टाकू? अशी विचारणा केली. यावर चेतन घोगरे यांनी उत्तर देतो पैशाची गरज नसल्याचे सांगितले.

    मोनिका यांच्या फेसबुक अकाउंट वरून पैशांची मागणी होत असल्याचे समोर आले. या घटनेने पोलीस कर्मचारी असलेल्या मोनिका इंगळे व त्यांचे पती चेतन घोगरे यांनी तात्काळ परिवारातील ग्रुपवर आपलं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची कल्पना दिली व कुणीही पैसे न टाकण्याचे आवाहन केले. त्यामुळे कुटुंबीय सावध झाले आणि बसणारा आर्थिक फटका टळला.

    काही दिवसांपूर्वी शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांचे फेसबुक अकाउंट सुद्धा हॅक करण्यात आले होते. काही लोकांकडून पैशांची मागणीही करण्यात आली होती. एका जवळच्या व्यक्तींनी साहेबांना काम असेल म्हणून तात्काळ दहा हजार रुपये सुद्धा त्यांच्या बँक खात्यात टाकले होते. अशाच प्रकारे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल गायकवाड यांच्या नावाने सुद्धा बनावट फेसबुक अकाउंट काढण्यात आले होते. त्यांच्या वतीने सुद्धा काही मित्र व नातेवाईकांना अडचणीत असून पैसे पाठविण्याची विनंती करण्यात आली होती.

    विशाल गायकवाड यांनी आपले फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिल्याने संबंधित नातेवाईक व मित्र सावध झाले.

    ऑनलाइन गुन्हेगारांनी थेट पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच निशाण्यावर घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात ऑनलाइन व्यवहाराविषयी अजूनच दहशत निर्माण झाली असून प्रचंड असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    fraudsters demand money police officers and police men facebook account hacked know the detail story