अल्पसंख्याकबहुल क्षेत्रातील विकासकामांसाठी २५ लाखांचा निधी

राज्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण भागात अनेक विकासकामे हाती घेण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्यात येत आहे. त्याद्वारे अमरावती जिल्ह्यातही विविध विकासकामांना चालना मिळणार असून, 25 लाख रुपयांचा निधी वितरित झाला आहे.

    अमरावती (Amravati).  राज्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण भागात अनेक विकासकामे हाती घेण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्यात येत आहे. त्याद्वारे अमरावती जिल्ह्यातही विविध विकासकामांना चालना मिळणार असून, 25 लाख रुपयांचा निधी वितरित झाला आहे. सकल समाजाचा सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री Adv. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

    राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक लोकसमूहातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार अल्पसंख्याक विभागाकडून राज्यातील विकासकामांसाठी 57 कोटी 33 लाख रुपये अर्थसंकल्पित करण्यात आले आहेत. त्यात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व तिवसा तालुक्यातील विविध कामांचा समावेश आहे. ही कामे वेळेत पूर्ण व्हावी म्हणून निधी मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार चालू टप्प्यात 25 लाख रुपये निधी शासनाने अमरावती जिल्ह्यातील कामांसाठी वितरित केला आहे.

    शेकुमियाँ दर्ग्याकरिता १० लाख
    मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई येथील शेकूमियाँ दर्ग्याच्या विकासकामासाठी 10 लाख रुपये, तिवसा तालुक्यातील कुऱ्हा मैदिव कब्रस्तानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 8 लाख रुपये, तर आखतवाडा येथे कबीरमियाँ दर्ग्याच्या विकासकामासाठी 7 लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. यापुढेही आवश्यक विकासकामांसाठी वेळीच निधी उपलब्ध होण्यासाठी नियमित पाठपुरावा करू. प्रशासन यंत्रणेने ही कामे गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण करावी. इतर आवश्यक कामांसाठी वेळेत प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले आहेत.