जसापूर ग्रापं साहित्य खरेदीत घोळ; सरपंचांकडून विस्तार अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप

जसापूरचे वर्तमान सरपंच मंगेश मधुकर थोरात यांनी रविवारी पत्रपरिषद घेऊन आरोप लावला की, विस्तार अधिकारी पी. एन. तेलंग यांनी ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी जसापूर ग्रामपंचायतीसह आठ ग्रामपंचायतींचे प्रशासक म्हणून कामकाज पाहिले.

  अमरावती. भातकुली तालुक्यातील जसापूर ग्रामपंचायतमधील तत्कालीन प्रशासक व विस्तार अधिकारी तेलंग यांनी ग्रामसभेची मान्यता न घेता 10 लाखांचे साहित्य खरेदी करून घोटाळा केल्याचा आरोप वर्तमान सरपंच मंगेश थोरात यांनी पत्रपरिषदेतून केला आहे.

  ग्रामसभेची मान्यता घेतली नाही

  जसापूरचे वर्तमान सरपंच मंगेश मधुकर थोरात यांनी रविवारी पत्रपरिषद घेऊन आरोप लावला की, विस्तार अधिकारी पी. एन. तेलंग यांनी ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी जसापूर ग्रामपंचायतीसह आठ ग्रामपंचायतींचे प्रशासक म्हणून कामकाज पाहिले. या कार्यकाळात 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 10 लाख रुपयांचे साहित्य खरेदी केले. त्यात लॅपटॉप,  प्रिंटर, कॉम्प्युटर, एलईडी लाईट, एलईडी टीव्ही अशा वस्तुंचा समावेश होता. या साहित्य खरेदीच्या देयकांवर प्रशासकाच्या रूपात विस्तार अधिकारी तेलंग यांची स्वाक्षरी आहे. परंतु यासाठी तेलंग यांनी  ग्रामसभेची मान्यता घेतली नाही. परस्पर हा खर्च केला.

  किमतींमध्ये मोठा फरक

  खरेदी केलेल्या वस्तुंची एकूण किंमत 3 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही. त्यामुळे या साहित्य खरेदीत तब्बल 7 लाख रुपयांची अफरातफर करण्यात आल्याचा आरोप सरपंच थोरात यांनी विस्तार अधिकारी तेलंग यांच्यावर केला आहे.  केवळ रेकॉर्ड बिल लावण्यात आले असून, प्रत्यक्ष खरेदी केलेल्या वस्तू ग्रामपंचायतीत उपलब्ध नाहीत.  देयक क्रमांक 16 मध्ये 99 हजार रुपये दिल्याची देयके रेकॉर्डवर लावण्यात आली आहे. परंतु डेल कंपनीचे सीपीयू, की-बोर्ड, माऊस, कॅनान कंपनीचे कलर प्रिंटर, एसर कंपनीचे लॅपटॉप ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नाही.

  देयकांचे केवळ रेकॉर्ड, प्रत्यक्ष वस्तू नाहीच

  एलईडी लाईट, घरगुती गॅस कनेक्शन, ई-लर्निंग सेट या साहित्याच्या देयकांचे रेकॉर्ड आहेत. परंतु यापैकी प्रत्यक्ष वस्तू नाहीत. या सर्व बिलांमध्ये मोठे घबाड झाले असून, हा प्रकार शासनाची फसवणूक करणारी आहे. त्यामुळे यासंदर्भात चौकशी करून कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आल्याची माहिती सरपंच थोरात यांनी पत्र परिषदेत दिली.

  सरपंचाने 10 लाख मागितले : विस्तार अधिकारी

  सरपंच थोरात यांनी लावलेले आरोप भातकुली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पी. ए.  तेलंग यांनी फेटाळून लावले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मंगेश थोरात यांनी दहा लाखांची मागणी करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामपंचायतीचे सर्व व्यवहार हे सचिव जयसिंह चौहान यांच्या  माध्यमातून झाले आहेत. मी केवळ  प्रशासक होतो. त्यामुळे या व्यवहाराशी माझा काही संबंध नाही. यासोबत सर्व साहित्य ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.