प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मोझरी येथील दलितवस्ती भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या घराची वीज कापल्याने संतप्त झालेल्या महिलांनी युवा संघर्ष संघटनेच्या नेतृत्वात तिवसा वीज वितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी हातमजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने हजारो रुपये वीजबिल भरण्याची परिस्थिती नाही.

    तिवसा (Tivasa).  मोझरी येथील दलितवस्ती भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या घराची वीज कापल्याने संतप्त झालेल्या महिलांनी युवा संघर्ष संघटनेच्या नेतृत्वात तिवसा वीज वितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी हातमजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने हजारो रुपये वीजबिल भरण्याची परिस्थिती नाही, याकारणाने महिलांनी गळ्यातील मंगळसूत्र काढून अभियंत्यांच्या टेबलावर ठेवत आक्रमक पवित्रा घेत वीजबिल भरेपर्यंत मंगळसूत्र तुमच्याकडेच राहू द्या, अशी मागणी केली.

    गेल्यावर्षी कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना पाच ते सहा महिन्यांचे वीजबिल आले नाही. त्यानंतर एकत्र हजारो रुपयांचे बिल आले. हे बिल भरणे सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर असून यामध्ये सवलत देण्याची मागणी होत आहे. मोझरी येथील दलितवस्ती भागात हातमजुरी करणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. सकाळी कामाला गेल्यावर त्यांची रात्रीच्या जेवायची सोय होते. या मजुरीतूनच येथील कुटुंब आपल्या संसाराचा गाडा चालवतात.

    महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या लोकांचा वीजपुरवठा खंडित केल्याने या महिलांनी कर्मचाऱ्यांसमोर वीजपुरवठा खंडीत करू नये, याकरिता हात जोडून विनंती केली. मात्र कर्मचाऱ्यांनी काही एक ऐकून न घेता वीज कापली. तेव्हा संप्तत झालेल्या महिलांनी महावितरण कार्यालय गाठून त्या ठिकाणी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या दिला. वीजबिलात कमी करून देण्याची मागणी यावेळी केली.

    मंगळसूत्र तुमच्याकडे गहाण ठेवा
    महिलांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र कार्यालयात ठेवून वीजबिल भरेपर्यंत कट केलेली वीज सुरू करण्याची मागणी महिलांनी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जसबोर ठाकूर, उपसरपंच प्रशांत प्रधान, सूरत धुमनखेडे, विकास तुरकाने, मनोज साबळे यासह अन्य महिला उपस्थित होत्या.