सचिन वाझेंना तातडीने संरक्षण द्या; आमदार रवी राणा यांची मागणी

मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्याप्रमाणे सचिन वाझे यांच्याही जिवाला धोका असून, त्यांना संरक्षण दिले पाहिजे अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. सचिन वाझेच्या NIA चौकशीमुळे मातोश्री अडचणीत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

    अमरावती : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्पोटकं सापडल्यानंतर भाजपने हा मुद्दा विधनसभा अधिवेशनात गाजवला होता. मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी निलंबीत करा, अशी मागणी विरोधकांकडून होत असताना हा तपास NIA ला दिला. वाझे यांना NIA ने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापत आहे. दरम्यान याचं प्रकरणी भाजपा आमदार रवी राणा यांनीही वक्तव्य केलं आहे.

    ज्याप्रकारे मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्याप्रमाणे सचिन वाझे यांच्याही जिवाला धोका असून, त्यांना संरक्षण दिले पाहिजे अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. सचिन वाझेच्या NIA चौकशीमुळे मातोश्री अडचणीत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. सचिन वाझेंचाही हिरेन होईल, म्हणून त्यांना तातडीने संरक्षण द्या, असं रवी राणा म्हणाले.

    तसेच त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन मोठा भुकंप होऊ शकतो, फक्त पोलीस आयुक्तांच्या बदल्या करुन,हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत. अशी भीती रवी राणा यांनी व्यक्त केली.