मनसेचे मनपा मुख्य प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलन

स्वाभिमाननगर, न्यू अमरावती रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नागरी वस्तीमध्ये नाल्या, रस्ते, स्ट्रीट लाईट तसेच स्चछतेची मोठी समस्या आहे.

    अमरावती. स्वाभिमाननगर, न्यू अमरावती रेल्वे स्टेशन परिसरातील विविध समस्यांसंदर्भात आठ दिवसांपूर्वी मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. परंतु या निवेदनाची दखल मनपा प्रशासनाने न घेतल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांनी मनपा प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी आंदोलनाची दखल घेत स्थानिक नागरिकांशी चर्चा केली.

    स्वाभिमाननगर, न्यू अमरावती रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नागरी वस्तीमध्ये नाल्या, रस्ते, स्ट्रीट लाईट तसेच स्चछतेची मोठी समस्या आहे. त्यामुळे या समस्या दूर करण्यात याव्या, याकरिता स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आठ दिवसांपूर्वी  मनपा प्रशासनाला निवेदन दिले होते. परंतु या निवेदनानंतरही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची सकारात्मक कारवाई करण्यात आली नाही.

    त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी गुरुवार, 25 मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मनपा मुख्य प्रवेशद्वारावर रस्ता रोको आंदोलन करीत मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी आंदोलनाची दखल घेत आंदोलकांसोबत चर्चा केली. या चर्चेमध्ये आठ दिवसात सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. आश्वासनानंतर मनसेने आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी महानगराध्यक्ष संतोष बद्रे, उपाध्यक्ष सचिन बावनेर, शहर सचिव निखिल बिजवे, मनविसे शहराध्यक्ष हर्षल ठाकरे, उपाध्यक्ष गौरव बेलूरकर, महिला जिल्हाध्यक्ष रिना जुनघरे, शहराध्यक्ष वृंदा मुत्तेवार, संगीता मडावी, निर्मला बोंडे, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष पवन लेंडे, सूरज बरडे, निखिल अवजेकर, सोजल फुटाणे, व्यंकटेश ईसोकार, शैलेश सूर्यवंशी, अमर महाजन, अशोक लाकडे, गजू चौधरी, नंदा महाजन, अर्चना महाजन, सविता हेमने, शीला झामरे आदी उपस्थित होते.