अमरावतीमधील इंटरनेट सेवा पूर्ववत; संचारबंदी कायम

अमरावती शहर हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, समाज माध्यमांवर भडकाऊ आणि वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्यास किंवा त्याचे प्रमाण वाढल्यास पुन्हा इंटरनेट सेवा बंद केली जाईल..

  अमरावती, नवराष्ट्र ब्युरो. बांग्लादेशातील हिंसाचाराविरोधात त्रिपुरात घडलेल्या घटना आणि त्यावरील अफवांवरून महाराष्ट्राच्या अमरावती, मालेगाव आणि नांदेडसह अनेक जिल्ह्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या. आधी मुस्लिम बांधवांनी काढलेल्या मोर्चात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या बंदमध्येही तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडल्या.

  या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. हिंसाचाराच्या घटनेला 6 दिवस पूर्ण झाल्यानंतर परिस्थितीचा आढावे घेत शुक्रवारी शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली.

  … तर पुन्हा निर्बंध
  अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यात अनेक वाहने आणि दुकानांचेही नुकसान झाले. त्यानंतर सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अखेर सहा दिवसानंतर शहरात इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी, वर्क फ्रॉम होम करणारे आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला.

  अमरावती शहर हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, समाज माध्यमांवर भडकाऊ आणि वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्यास किंवा त्याचे प्रमाण वाढल्यास पुन्हा इंटरनेट सेवा बंद केली जाईल, असे अमरावती शहराच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी स्पष्ट केले. इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली असली तरी संचारबंदी मात्र अद्यापही कायम ठेवण्यात आली आहे.

  अकोट, अकोला, चंद्रपुरात जमावबंदी
  अमरावतीतील हिंसाराच्या पार्श्वभूमीवर अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यासह अकोटमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावतीतील हिंसक रॅलीचे पडसाद अकोल्यातही दिसून आले होते. त्यामुळे गेल्या 13 नोव्हेंबरपासून अकोला शहरात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता 21 नोव्हेंबरपर्यंत या संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये सर्व नियम कायम आहेत. पण यापुढे धरणे, आंदोलन किंवा मोर्चे असतील या सर्वांना निर्बंध असणार आहेत. मात्र. आता सायंकाळी सात वाजेनंतर कोणीही बाहेर दिसल्यास किंवा संचारबंदीचे नियम मोडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.