तर, भाजप जेलभरो आंदोलन करणार; अमरावती हिंसाचारावरुन फडणवीसांचा इशारा

'एका घटनेसाठी चार-चार पोलिस ठाण्यात कारवाई केली आहे. ज्यांचा काही संबंध नाही, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जात आहे. जर खोट्या गुन्ह्यात अडकवायचे असेल तर आमचे सारे कार्यकर्ते एकत्र जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

    अमरावती (Amravati ) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहे. त्रिपुरातील घटनेवरुन अमरावतीत घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस अमरावतीत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे. अमरावतीतील व्यापारी आणि घटनास्थळी भेट दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

    ‘१२ तारखेच्या घटनेला टार्गेट केलं जात आहे. आदल्या दिवशी झालेला घटनाक्रम दुर्लक्षित करायचा आणि केवळ दुसऱ्या दिवशीच्या घटनांवर केवळ लक्ष केंद्रीत करायचे हे योग्य नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात येत आहे. टार्गेट करून, याद्या तयार करून सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे,’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

    ‘एका घटनेसाठी चार-चार पोलिस ठाण्यात कारवाई केली आहे. ज्यांचा काही संबंध नाही, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जात आहे. जर खोट्या गुन्ह्यात अडकवायचे असेल तर आमचे सारे कार्यकर्ते एकत्र जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच, त्रिपुरा येथे जी घटना घडली नाही, त्यावर १२ तारखेचा मोर्चा निघाला. हे मोर्चे मोठ्या षडयंत्राचा भाग होता. मात्र जणू १२ तारखेला काही घडलेच नाही, असे सांगण्याचा राज्य सरकार आणि पोलिसांचा प्रयत्न आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा प्रचंड दबावात काम करते आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.