भरधाव ट्रकची ऑटोला धडक; प्रवासी फुटबॉलप्रमाणे फेकल्या गेले

वरुड तालुक्यातील आमनेर येथून एमएच २७ एसी ८५९० क्रमांकाचा ऑटो प्रवासी घेऊन वरुडकडे येत होता. रोशनखेडा फाट्यावर मागून येणाऱ्या एमएच ३० बीडी १७२६ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. यात ऑटोतील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले.

    वरुड (Warud) : तालुक्यातील रोशनखेडा फाट्यावर नागपूरवरून येणाऱ्या भरधाव ट्रकने ऑटोला मागून धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. एक युवक गंभीर जखमी असून, प्रकृती चिंताजनक आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या अपघाताने समाजमन सुन्न झाले आहे. घनश्याम साहू व जिजाबाई भाकरे असे मृतांची नावे आहेत.

    वरुड तालुक्यातील आमनेर येथून एमएच २७ एसी ८५९० क्रमांकाचा ऑटो प्रवासी घेऊन वरुडकडे येत होता. रोशनखेडा फाट्यावर मागून येणाऱ्या एमएच ३० बीडी १७२६ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. यात ऑटोतील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. अपघातात विकास रमेशराव कांबळे (वय ३०), सुनील नारायण मोरे (वय ४५), निलोफर सैजत काझी (वय २६), राणीया शेख अजीस शेख (वय ४८), अजाब महादेव मोरे, सीमा सुनील मोरे (वय ३५), बबल्या रामजी सोनवणे (वय ३२, सर्व रा. आमनेर), घनश्याम मौजीलाल साहू (वय ६५, रा. वाठोडा), जिजाबाई रामदास भाकरे (वय ५५, रा. बाभूळखेडा) असे ऑटोतील नऊ प्रवासी जखमी झाले.

    जखमींना ग्रामीण रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. जखमींपैकी घनश्याम साहू व जिजाबाई भाकरे यांचा उपचारादरम्यान ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला तर बबल्या सोनवणे याची प्रकृती गंभीर असल्याने अमरावती येथे हलविण्यात आले. घटनास्थळासह ग्रामीण रुग्णालयात जखमींसह मृतांच्या नातेवाइकांना सांत्वन देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार, शिवसेना तालुकाप्रमुख विजय निकम आदी तळ ठोकून होते.

    घटनास्थळावर ठाणेदार प्रदीप चौगावकर, पोलिस उपनिरीक्षक शशिकांत पोहरे यांच्यासह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी एमएच ३० बीडी १७२६ क्रमांकाच्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.