शिक्षकांनी केली लसीकरणाची मागणी

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना कोविड लसीचा लाभ मिळणे अत्यंत आवश्यक आहे, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा अमरावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

    अमरावती. कोविड- 19 च्या प्रादुर्भावात आपत्कालीन परिस्थितीत गेले वर्षभर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक जिल्हा प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांनी विविध ठिकाणी आपले कर्तव्य बजावलेले आहे. सद्यस्थितीत आरोग्य कर्मचारी, महसुल विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचारी आदींना शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी कोविड लस देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना कोविड लसीचा लाभ मिळणे अत्यंत आवश्यक आहे, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा अमरावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

    जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे आदेशान्वये शिक्षणाधिकारी (प्राथ.) व गटशिक्षणाधिकारी (सर्वशिक्षा) यांनी 25 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे कुटुंब सर्वेक्षण करण्याच्या सूचना शिक्षकांना दिलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांचा थेट संपर्क विद्यार्थी- पालक आणि गावातील कुटुंब यांच्याशी येत असल्याने कोविड-19 प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक लस सर्व प्राथमिक शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी प्राथमिक शिक्षक समिती शाखा अमरावतीची आग्रही मागणी आहे.

    याबाबत आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना कोविड-19 प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेश निर्गमित करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे, जिल्हा कोषाध्यक्ष मनीष काळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, महिला आघाडी प्रमुख सरिता काठोळे, सरचिटणीस योगिता जिरापुरे, कार्याध्यक्ष सुषमा वानखडे, कोषाध्यक्ष भावना ठाकरेसह जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी केली आहे.