तृतीयपंथीयाचा आत्महत्येचा प्रयत्न, माफीनंतर प्रकरण शांत; पोलिस ठाण्यात मिटला वाद

अमरावती येथील तृतीयपंथी समुदायाला बदनाम करणाऱ्या त्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी शुक्रवारी इर्विन चौकात तृतीयपंथीयांनी ठिय्या मांडला होता.

    अमरावती (Amravati).  तृतीयपंथी समुदायाला बदनाम करणाऱ्या त्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी शुक्रवारी इर्विन चौकात तृतीयपंथीयांनी ठिय्या मांडला होता. या आंदोलनदरम्यान एका तृतीयपंथीयाने अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. सुदैवाने तेथे उपस्थित महिला पोलिसांनी तत्काळ रॉकेल अंगावर घेणाऱ्या त्या तृतीयपंथीयाला पकडल्याने मोठा अनर्थ टळला.

    यावेळी तृतीयपंथीयांनी रोष व्यक्त केल्याने पोलिसांची ताराबंळ उडाली होती. अखेर पोलिसांनी तृतीयपंथी व लॉयन्स ग्रुपच्या सदस्यांना ठाण्यात बोलावून सामंजस्याने हे प्रकरण शांत केले.

    असे होते प्रकरण
    काही दिवसांपूर्वी दोन तरुण नृत्य कलाकार तृतीयपंथी बनून फिरत असल्याचे निंभोरा येथील तृतीयपंथीयांना आढळून आले होते. हा प्रकार पाहून तृतीयपंथीयांनी त्या दोन तरुणांना पकडले आणि त्यांना नग्न करून त्यांचे केस कापले. या घटनेच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी तृतीय पंथीयांविरुद्ध गुन्हा नोंदविला. दरम्यान त्या दोन कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी लॉयन्स ग्रुपचे सदस्य सरसावले.

    आम्हाला नकली तृतीयपंथी म्हटल्याचा आरोप तृतीय पंथीयांनी लायन्स ग्रुपवर केला. हा प्रकार बदनामीकारक असल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या, असे मत तृतीयपंथीयांनी व्यक्त केले. यावरून तृतीयपंथीयांनी त्या दोन तरुणांवर गुन्हा नोंदवा, अशी मागणी करून इर्विन चौकात शुक्रवारी ठिय्या मांडला होता.