प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

धामणगाव रेल्वे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रतिष्ठाने उघडी ठेवण्याकरिता वेळेचे निर्बंध लावण्यात आले आहे; परंतु ग्रामीण भागातील हॉटेल्स व्यावसायिकांकडून मात्र नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

    धामणगाव रेल्वे (Dhamangaon Railway). कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रतिष्ठाने उघडी ठेवण्याकरिता वेळेचे निर्बंध लावण्यात आले आहे. परंतु ग्रामीण भागातील हॉटेल्स व्यावसायिकांकडून मात्र नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणावरून कोरोना पसरण्याची भीती व्यक्त होत असून, स्थानिक प्रशासन हॉटेल्स चालकांवर कारवाई करेल का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

    जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नियमावली जाहीर करून, व्यावसायिकांना निश्चित वेळेतच व्यवसाय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु ग्रामीण भागातील व्यावसायिकांकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र  पहायला मिळत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग अमरावती शहर व ग्रामीण भागात कमी व्हावा या उद्देशाने त्रिसूत्री कार्यक्रम जिल्हाभरात राबविला जात आहे.

    शहर व ग्रामीण भागातील हॉटेल्स व्यावसायिकांना सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंतच आपला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागातील हॉटेल्स चालकांकडून मात्र नियमांचे उल्लंघन होत आहे. स्थानिक प्रशासनाकडून मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या हॉटेल्समधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईची मागणी होत आहे.