प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर कायदा केला असला तरी या कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन राजकीय वरदहस्तामुळे बीटीबी भाजी मार्केट संचालकाने चार टक्के चक्रवाढ व्याजाने रक्कम देऊन शेतजमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मोगरा शिवनी येथील शेतकरी विजय खोब्रागडे यांनी केला आहे.

  लाखनी (Lakhni).  अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर कायदा केला असला तरी या कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन राजकीय वरदहस्तामुळे बीटीबी भाजी मार्केट संचालकाने चार टक्के चक्रवाढ व्याजाने रक्कम देऊन शेतजमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मोगरा शिवनी येथील शेतकरी विजय खोब्रागडे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी सहकार आणि पोलिस विभागाकडे तक्रार केली आहे.

  विजय महादेव खोब्रागडे यांची पत्नी सुनिताच्या नावे मौजा मोगरा शिवनी तालुका लाखनी येथे 8 हेक्टर 31 आर शेतजमीन होती. जोडधंदा करण्याच्यादृष्टीने डेरी फार्मकरिता त्यांनी देना बँक शाखा भंडाराकडून 2013- 14 या आर्थिक वर्षात 53 लाख रुपये कर्ज घेतले. परंतु व्यवसाय बुडाल्याने नियमित कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे बँकेने कायदेशीर कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार केला.

  या रकमेची आवश्यकता असल्यामुळे विजय खोब्रागडे यांनी बीटीबी भाजी मार्केटचे संचालक बंडू बारापात्रे व पौर्णिमा बारापात्रे हे शेकडा 4 रुपये व्याजदराने लागेल तेवढी रक्कम देत असल्याचे माहित झाले. त्यामुळे 12 मार्च 2019 रोजी त्यांच्या बीटीबी भाजी बाजारातील कार्यालयात भेट घेतली. 4 टक्के प्रतिमहिना व्याजदर तथा मालकीची मोगरा शिवनी येथे असलेली शेतजमीन गहाण करून देण्याचे अटीवर बारापात्रे यांच्याकडून 2019 मध्ये 2 टप्प्यात 48 लाख रुपये व्याजाने घेतल्याचे विजय खोब्रागडे यांचे म्हणणे आहे.

  ठरल्यानुसार, गहाण करण्यासाठी शेत जमिनीचे सातबारा आणि आवश्यक कागदपत्रे दिले. परंतु आम्हाला अंधारात ठेवून बारापात्रे यांनी स्वतःचे व पत्नीच्या नावे शेतजमीन खरेदी-विक्री व्यवहाराची दुय्यम निबंधक कार्यालय यांच्याकडून नोंदणी करून फसवणूक केल्याचा आरोप खोब्रागडे यांनी केला आहे. व्याजाने घेतलेल्या रकमेपोटी 29 लाख रुपये परतफेड केली असता व्याजातच सर्व रक्कम गेल्याचे बारापात्रे यांनी सांगितल्याचे विजय खोब्रागडे यांचे म्हणणे आहे.

  खरेदी-विक्री व्यवहारात गट क्रमांक 235 मध्ये असलेल्या घराचा उल्लेख नसताना बळजबरीने घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याने बारापात्रेविरुध्द लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बंडू बारापात्रे यांनी अवैध सावकारीच्या माध्यमातून शेतजमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा याकरिता सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे, पोलीस अधीक्षक भंडारा यांच्याकडे खोब्रागडे यांनी तक्रार केली आहे.

  गट क्र. 235 मधील जागा आणि घर खोब्रागडे यांनी आपल्याला विकली आहे. प्लॉट एनए झालेला नसल्यामुळे त्याची Ragistry होत नसली तरी नोटरी केलेली आहे. या जागेचे संपूर्ण पुरावे आपल्याकडे असताना या लोकांनी माझ्याविरुद्ध् तक्रार केली.
  — बंडू बारापात्रे, बीटीबी बाजार, भंडारा