मुलाला सोन्याची अंगठी न दिल्याचा राग उफाळून आला; सुनेने सासूच्या अंगावर ओतलं उकळतं पाणी

सासूने स्वतःसाठी सोन्याची नवीन अंगठी केली, मात्र आपल्या मुलाला अंगठी न करुन दिल्याने वाद झाला होता. त्यामुळे सुनेने आंघोळीसाठी गरम केलेले पाणी चक्क सासूच्या अंगावर ओतले. ही धक्कादायक घटना भंडारा शहरातील रामनगरातील किसान चौकात घडली आहे.

    भंडारा (Bhandara) : सोन्याची अंगठी करुन दिली नाही म्हणून सुनेने सासूच्या अंगावर उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भंडारा शहरातील किसान चौकात हा प्रकार घडला असून आरोपी सुनेविरुद्ध भंडारा शहर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    काय आहे प्रकरण? (What’s the matter)
    सासूने स्वतःसाठी सोन्याची नवीन अंगठी केली, मात्र आपल्या मुलाला अंगठी न करुन दिल्याने वाद झाला होता. त्यामुळे सुनेने आंघोळीसाठी गरम केलेले पाणी चक्क सासूच्या अंगावर ओतले. ही धक्कादायक घटना भंडारा शहरातील रामनगरातील किसान चौकात घडली आहे.

    या घटनेत सासू जखमी झाली असून कलयुगी सुनेविरुद्ध भंडारा शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुष्पा ओमप्रकाश गभने (वय 65 वर्ष) असे जखमी सासूचे नाव असून अलका अरविंद गभने (वय 37 वर्ष) असे आरोपी सुनेचे नाव आहे.

    मुलाला सोन्याची अंगठी न केल्याचा राग (Anger at not giving the child a gold ring)
    किसान चौकात राहणाऱ्या सासू पुष्पा गभने यांनी आपल्यासाठी जुन्या सोन्याच्या अंगठीमध्ये एक ग्रॅम नवीन सोने टाकून अंगठी तयार केली. तुम्ही स्वतःसाठी नवी अंगठी केली, पण माझ्या मुलाला का अंगठी करुन दिली नाही, असे म्हणून सुनेने शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

    गरम पाण्यामुळे सासू भाजली (Mother in law was burnt by hot water)
    याच भांडणातून सुनेने घरातील गॅसवर ठेवलेले गरम पाणी सासूच्या अंगावर ओतले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना तात्काळ भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्या आता लाखनीला मुलीकडे आहेत. या प्रकरणी भंडारा शहर पोलिसांनी आरोपी सुनेच्या विरुद्ध कलम 324, 504, 506 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

    बुलडाण्यात सुनेने चुलत सासूचा जीव घेतला
    दुसरीकडे, चुलत सुनेनेच सासूची हत्‍या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोन्याच्या हव्यासपोटी सासूच्या अंगावरुन दागिने ओरबाडले, तर कानाचेही लचके तोडले होते. बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्‍यात ही थरारक घटना घडली.

    काय आहे प्रकरण?
    लोणार तालुक्यातील भुमराळा शिवारात वृद्ध महिलेची हत्या करुन तिच्या अंगावरील दागिने लंपास केल्याची घटना समोर आली होती. कपाशीच्या शेतात 65 वर्षीय वृद्ध महिला कासाबाई चौधरी यांचा मृतदेह आढळला असल्याने परिसरात खळबळ उडाली होती. कासाबाई यांच्या अंगावरील दागिने अक्षरशः ओरबाडले होते, तर कानाचे लचकेही तोडलेले होते.

    मारेकऱ्याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले. तपासावेळी पोलिसांनी खून प्रकरणात तिच्या चुलत सुनेला अटक केली. तिने खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

    शेतात काम करताना सासूची हत्या
    नंदाबाई उद्धव चौधरी असे आरोपी महिलेचे नाव असून, सोने-चांदीच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी तिने चुलत सासूचा खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी नंदाबाई आणि मृत कासाबाईंचे शेत शेजारी-शेजारीच आहे. 18 सप्टेंबरच्या सायंकाळी दोघीही आपापल्या शेतात काम करत होत्या. नंदाबाईने चुलत सासू कासाबाईंच्या अंगावरील दागिने मिळवण्यासाठी तिची हत्या केली. कानाचे लचके तोडून दागिने लांबवले.