मजुरी करायला गेलेल्या शेतमजूर-मशीन चालकात वाद; मारहाणीत शेतमजुराचा मृत्यू

सोयाबीन चुराई मशीनवर बाहेरील तालुक्यात मजुरी करायला गेलेल्या शेतमजुराचा मशीन चालकात वाद होऊन प्रकरण हाणामारीत गेले. मशीन चालकाकडून झालेल्या जबर मारहाणीत शेतमजुराचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या शेतमजुराचे नाव दादाजी सदाशिव मरापे (वय 55) असे असून, तो नागभीड तालुक्यातील नांदेड येथील रहिवासी आहे.

    वाढोणा : सोयाबीन चुराई मशीनवर बाहेरील तालुक्यात मजुरी करायला गेलेल्या शेतमजुराचा मशीन चालकात वाद होऊन प्रकरण हाणामारीत गेले. मशीन चालकाकडून झालेल्या जबर मारहाणीत शेतमजुराचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या शेतमजुराचे नाव दादाजी सदाशिव मरापे (वय 55) असे असून, तो नागभीड तालुक्यातील नांदेड येथील रहिवासी आहे. तर आरोपीचे नाव खेमराज आबाजी बारसागडे (वय 30) असे असून, तो धामणगाव चक येथील रहिवासी आहे. त्याच्यावर खुनाच्या आरोपाखाली गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, त्याला तळोधी पोलिसांनी ताब्यात घेतले.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी गोविंदा रामटेके यांनी त्यांची सोयाबीन चुराई मशीन व्यवसायासाठी चिमूर तालुक्यात पाठविली होती. मशीनवर काम करणारे मजूरही नागभीड तालुक्यातील नांदेड परिसरातील आसपासच्या गावातीलच होते. दरम्यान काम आटोपून सर्व मजूर मशीनसह रेंगाबोडी ता. चिमूर येथे पोहचले असताना गाडीचा टायर पंक्चर झाला. तेव्हा मशीन चालकासह दोन मजूर उपस्थित राहून बाकी सर्व गावाकडे निघून गेले. यात आरोपी ड्रायव्हर व शेतमजूरात जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात आरोपी खेमराज बारसागडे यांनी दादाजी मरापे यास जबर मारहाण केली.

    मारामुळे तो तिथून पळून खडसंगी गावापर्यंत गंभीर अवस्थेत पायी चालत आला व खाली कोसळला. नांदेड गावातील लोकांना तो पडलेल्या अवस्थेत दिसल्याने त्याला त्याच्या गावला आणून सोडले. तळोधी येथील खाजगी रुग्णालयात त्यावर उपचार करून घरी गेले असता मंगळवारी रात्री 8 वाजताच्या त्याचा मृत्यू झाला. तळोधी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नागभीडला पाठविला.