प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

संपूर्ण राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. यापूर्वीच मरगळलेला उद्योग व व्यवसाय पुन्हा कुपोषित होत आहे. शेतकरी, व्यापारी व लघुउद्योजक कर्जबाजारी आहेत.

  संदीप नंदनवार
  लाखनी (Lakhni).  संपूर्ण राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. यापूर्वीच मरगळलेला उद्योग व व्यवसाय पुन्हा कुपोषित होत आहे. शेतकरी, व्यापारी व लघुउद्योजक कर्जबाजारी आहेत. कर्जाची वसुली करण्यासाठी सोसायटी, बँकाची तसेच महावितरणची वीजबील वसुली मोहीम जोरात सुरू आहे.

  मागील लॉकडाऊन काळातच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता पुन्हा कोरोनामुळे अनेक भागात अंशतः  लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे शेतमालाला भाव मिळत नाही. त्यात जुलमी वीज वसुली सुरू आहे. अनेक भागात कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करून जबरदस्तीने वीज बिल वसुली सुरू आहे. अशी स्थिती असताना बँकांनी व सोसायट्यांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा लावला आहे.  अनेक सहकारी व खासगी बँकांचे प्रतिनिधी वसुलीसाठी दारावर येवून पडत असल्याने लहानमोठे व्यावसायिक, शेतकरी बेजार झाले आहेत.

  शेतकऱ्यांनी महावितरणाच्या आडमुठेपणामुळे कसेबसे हात उसने पैसे घेऊन काही प्रमाणात बिल भरले होते. तरीही संपूर्ण वीजबिलासाठी कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतातील उभे पीक सुकत चालले आहे. लॉकडाउनपासून व्यापाऱ्यांनासुद्धा मोठा फटका बसला. दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद होती. जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर व्यवसायाला मोठा फटका बसला. त्यामुळे अनेकांना कर्जाचे हप्तेही भरता आले नाही. व्याजाची रक्कम वाढत गेली. दरम्यान अनलॉकनंतर परिस्थिती काहीशी सुधारत असताना पुन्हा कोरोनाने हातपाय पसरले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात पुन्हा मंदीचे वातावरण आहे. असे असताना बँकांनी कर्जवसुलीसाठी नोटिसा दिल्या आहेत.  त्यांच्या दारात चकरा मारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे  शेतकरी, लहान दुकानदार, व्यावसायिक हतबल झाले आहेत.

  मदतीची प्रतीक्षाच
  लॉकडाउनंतर शेतकऱ्यांनी कशीबशी  पिके जगविली. पीक बहरात आल्यावर अतिवृष्टीने घालविले. बळीराजाच्या हातात काहीच शिल्लक राहिले नाही. सरकारने पंचनामा करण्याची नौटंकी केली. खरे नुकसानग्रस्त शेतकरी वंचित ठेवून पंचनामा पूर्ण केला. मात्र, मदतीच्या नावाने बोंब आहे. आजही अनेक नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून गेले आहे. सोसायटी आणि बँकाकडून घेतलेले पीक कर्ज फेडण्यासाठी पैसा आणायचा कुठून याची चिंता त्यांना सतावत आहे.

  पुन्हा कर्जाचा डोंगर वाढणार
  तालुक्याचे अर्थकारण बऱ्यांच अंशी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. कृषी क्षेत्राला पतपुरवठा करणाऱ्या सोसायट्यांची संख्या सरासरी नव्वदच्या वर आहे. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ही पीक कर्जावर होत आहे. यात सहकारी, खासगी बँकांच्या समावेश आहे. बँकिंग क्षेत्रातील अर्थकारण कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या वर्षापासून कृषी क्षेत्रात मरगळ आली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना फटका बसल्यानंतर आता रब्बी हंगामात तुटपुंजे उत्पन्न पदरात पडणार आहे. यातच कर्जफेड, कुटुंबाचा खर्च, पुन्हा शेतीत गुंतवणूक अधिक खर्च करावा लागणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना कर्जाची नूतनीकरण करून करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे जुन्या कर्जाचा भार मानगुटीवर बसणार आहे.