दहशत : मानवनिर्मित टेकड्यांचा बळावला धोका; दोन गावे गडप होण्याची भीती

तुमसर तालुक्यातील डोंगरी येथे खुली मॅगनिज खान आहे. मॅगनीज उत्खननादरम्यान खाणीतून लहान-मोठे दगड व मातीचा मलबा मोठ्या प्रमाणात निघतो. या मलब्याचे मोठ्या टेकड्यांत रुपांतर झाले आहे.

    तुमसर (Tumsar).  तालुक्यातील डोंगरी येथे खुली मॅगनिज खान आहे. मॅगनीज उत्खननादरम्यान खाणीतून लहान-मोठे दगड व मातीचा मलबा मोठ्या प्रमाणात निघतो. या मलब्याचे मोठ्या टेकड्यांत रुपांतर झाले आहे. खाणी शेजारील बाळापूर व कुरमुडा गावांना मानवनिर्मित टेकड्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात भूस्खलन होऊन दोन्ही गावे गडप होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

    डोंगरी येथे ब्रिटिशकालीन जगप्रसिद्ध मॅगनिज खान आहे. ब्रिटिशांनी या खाणीचा शोध लावला होता. घनदाट जंगलात हा संपूर्ण परिसर आहे. जगात अतिशय उच्च दर्जाचे मॅगनिज येथील भूगर्भात मिळते. सध्या सदर खाणी भारत सरकारच्या अंतर्गत येतात. येथील खाण ही ओपन कास्ट आहे. खाणीतून मॅग्नेट काढतानाच्या सोबत लहानमोठे दगड व मलबा मोठ्या प्रमाणात निघतो.

    खाण प्रशासनाने सदर मलब्याची विल्हेवाट खाणीपासून काही अंतरावर केली आहे. मागील अनेक वर्षांपासून हा मलबा घालणे सुरू आहे. त्यामुळे खान परिसरात मानवनिर्मित टेकड्या तयार झाल्या आहेत. शेजारी बाळापूर व कुरमुडा ही गावे आहेत. सदर टेकड्या या गावाच्या जवळपर्यंत आलेल्या आहेत. टेकडीच्या खाली गावे असल्याने पावसाळ्यात भूस्खलन होऊन ही गावे गडप होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    टेकड्यांची उंची वाढली
    डोंगरी येथील मॅगनिज खाणीतून निघणारे दगड व मलबा मोठ्या प्रमाणात निघत आहे. सदर मलबा घालून घालून त्यांना टेकड्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. टेकड्यांची उंची मोठी झाल्यानंतरही सदर मलबा इतर ठिकाणी घालण्यात येत नाही. त्यामुळे हा मलबा भूस्खलनाचा धोका येथे वाढला आहे. कोट्यवधींचा नफा देणारी ही मॅग्निज खाण आहे.