युवकाची इंधनाच्या वाढत्या दरावर मात; बॅटरीवर चालणाऱ्या सायकलची निर्मिती

गजानन सोनुने या युवकाने इंधनाच्या वाढत्या दरावर मात करीत, टाकाऊ साहित्यापासून सुंदर जुगाड करीत बॅटरीवर चालणारी सायकल बनवली आहे. ही सायकल बॅटरीच्या ऊर्जेवर जवळपास पाच किलोमीटरपर्यंत चालू शकते.

  संजय बयस
  शिरपूर जैन (Shirpur Jain).  गजानन सोनुने या युवकाने इंधनाच्या वाढत्या दरावर मात करीत, टाकाऊ साहित्यापासून सुंदर जुगाड करीत बॅटरीवर चालणारी सायकल बनवली आहे. ही सायकल बॅटरीच्या ऊर्जेवर जवळपास पाच किलोमीटरपर्यंत चालू शकते. या युवकाच्या संकल्पनेतून तयार झालेल्या सायकलीवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

  ही सायकल यापेक्षाही जास्त अंतर कसे कापेल यासाठी या युवकाचे प्रयोग करणे सुरूच आहे. आपल्या देशात कलाकारांची कमतरता नाही. केवळ थोडे मार्गदर्शन, आर्थिक बळ, बुद्धिमत्तेची जोड व साहित्याची उपलब्धता झाल्यास विविध क्षेत्रात खूप सारे कलाकार तथा संशोधक निर्माण होऊ शकतात. येथील गजानन लक्ष्मण सोनुने नामक पाणीपुरी व भेळ गाडी चालविणाऱ्या सर्वसाधारण युवकाने फावल्या वेळात टाकाऊ वस्तूपासून बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली आहे. या सायकलला सजवताना त्यांनी गॅरेजमधील मोटरसायकलचे निरुपयोगी साहित्य वापरले. सायकलवर 12 व्होल्टेजची बॅटरी लावली असून, जुगाड करीत टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या या सायकलसाठी कुठलाही खर्च आला नसल्याचे गजानन सोनुने यांनी सांगितले.

  सोनुने यांनी गॅरेजमधील मोटरसायकलचे काढून टाकलेले इंडिकेटर, इंडिकेटर डब्बी, हेडलाईट, टेललाईट, मडगार्ड, पॅनल, बटन, केबल वायर, स्वीच, हॉर्न, चेन आदी साहित्य वापरून आपल्या अफाट कल्पनेतून बॅटरीची ऊर्जा कमी जळावी या हेतूने हा प्रयोग करीत, हेडलाईट, इंडिकेटरमध्ये एलईडी लाईट वापरले. तर, बॅटरी जास्त वेळ टिकावी, यासाठी त्यांनी पंख्याची मोटर वेगळ्या पद्धतीने वाइंडिंग करीत वापरली. सदर सायकल बॅटरीवर जवळपास 5 किलोमीटर अंतरपर्यंत चालू शकते. त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीतून तयार झालेल्या सायकलला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

  प्रयोगशील स्वभाव
  मुळातच गजानन सोनुने यांचा स्वभाव हा प्रयोगशील व संशोधनात्मक आहे. त्यांनी असले काही प्रयोग पूर्वी देखील केले आहेत. ते सध्या आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी भेळ, पाणीपुरीची गाडी चालवितात. कामातून त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांनी ही बॅटरीवरील सायकल निर्माण करण्याचे काम हाती घेऊन पूर्णत्वास नेले. त्यातही ही सायकल अजून यापेक्षाही जास्त अंतर कसे कापेल? यासाठी ते प्रयोगशील आहेत.

  बटनवर चालणारी सायकल
  विविध टाकाऊ साहित्यापासून जुगाड करीत बनवलेल्या बॅटरीवरील सायकलचे बटन दाबताच ती चालते. तर बटन बंद करता ती थांबते. हेडलाईट, टेललाईट, इंडिकेटर, हॉर्न आदीसुद्धा बटना वरच आधारित आहे. सध्या इंधनाचे दर वाढत आहेत त्यामुळे बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची संकल्पना शासनाकडूनही समोर येत आहे. गजानन सोनुने यांनी आपल्या बुद्धीमत्तेद्वारे कल्पनाशक्तीला जोर लावत बॅटरीवर चालणारी सायकल बनवून चालवून दाखवली.