लग्न जुळत नसल्याने व्यथित तरुणाची आत्महत्या; समाजमन सुन्न

    भंडारा (Bhandara): वय उलटून चालले तरी लग्न जुळत नाही यामुळे चिंतेत सापडलेल्या एका तरुणाने आपल्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भंडारा तालुक्यातील मांडवी येथे मंगळवारी रात्री उघडकीस आली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. राकेश केवळराम कोटांगले (३१) रा. मांडवी असे मृताचे नाव आहे.

    काही महिन्यांपूर्वी त्याच्या आईचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे विमनस्क झाला होता. अशातच त्याचे लग्नही जुळत नव्हते. आपल्या मित्रांची लग्ने झाली. आपले कधी होणार, आता तर आईही नाही. आपले पुढे काय होणार, या विवंचनेत राकेशने मंगळवारी रात्री आपल्या घरातील स्वयंपाकखोलीत गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच गावकरयांनी कारधा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बंडू थेरे करीत आहे.