प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

भंडारा नगरपरिषदेच्या उदासीन धोरणामुळे शहरातील नाल्या घाण व कचऱ्याने तुंबलेल्या आहेत. तुंबलेल्या नाल्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे.

    भंडारा (Bhandara).  नगरपरिषदेच्या उदासीन धोरणामुळे शहरातील नाल्या घाण व कचऱ्याने तुंबलेल्या आहेत. तुंबलेल्या नाल्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. भंडारा शहरातील लोकसंख्या लाखोच्या घरात असून या एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी विविध सोयी सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत.

    या सोयी सुविधांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून येथे स्वच्छतेची जबाबदारी नगर परिषदेकडे देण्यात आलेली आहे. शहरातील शितला माता मंदिराजवळील परिसरात नाल्या घाण व कचऱ्याने तुंबल्याने सांडपाणी वाहून न जाता तेथेच साचून राहतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.

    शहरातील अनेक प्रभागात अशाच समस्या निर्माण झाल्या असून याबाबतीत नागरिकांची नेहमीच ओरड होत असते. अशा नाल्या तुंबल्यामुळे परिसरातील घाणीचे साम्राज्य असतेच मात्र त्यामुळे दुर्गंधीचाही दुष्पपरिणाम नागरिकांना सहन करावा लागतो. अशा स्वरुपाच्या दुर्गंधीमुळे तुंबलेल्या नाल्या असलेल्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.

    नगर परिषदेचे दुर्लक्ष
    शहरातील स्वच्छतेचा कारभार नगर परिषदेकडे देण्यात आले असून या विभागाने आपले काम चोखपणे न करता या विभागाचा चालढकलपणा दिसून येत आहे. शहरातील अनेक परिसरातील नाल्या घाणीने तुंबल्या असून त्या परिसरात डासांचा व दुर्गंधीचा प्रादुर्भाव दिसून येत असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या या समस्येकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.