
भंडारा (Bhandara) : जुन्या वादातून येथील आंबेडकर वॉर्डात (Ambedkar ward) दोन गटांत हाणामारी होण्याची घटना घडली. तलवारीने आणि रॉडने (swords and rods) एकमेकांवर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही गटांच्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहिल भीमराव बांबोर्डे (२१) याने दिलेल्या तक्रारीनुसार तो आपल्या घरी सोमवारी झोपला होता. त्यावेळी आरोपी उमेश सोनकुसरे (२२, रा.गांधी चौक), अमित महाकाळ (२५, रा.भय्याजी नगर), रज्जू राजवाडे (४५, रा.कुंभारटोली), चिंटू सोनेकर (२४) आणि कुणाल (२२) हे त्याच्या घरी आले. त्याला बेडवरून खाली खेचून मारहाण सुरू केली. त्यात उमेश सोनकुसरेने आपल्या हातातील तलवारीने त्याच्यावर हल्ला केला. मात्र, साहिलने तो वार आपल्या हातावर झेलला. यात त्याच्या करंगळीला जबर दुखापत झाली. तसेच आई व बहीण भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही लोटलाट करण्यात आली.
रज्जू उर्फ रामकृष्ण माणिक शेंद्रे याने दिलेल्या तक्रारीनुसार तो सोमवारी आपल्या घरी असताना आरोपी भय्या सोनटक्के (२८), चिंटू उर्फ मायकल सोनटक्के (२३), युनूस शेख (२३), साहिल भीमराव बांबोर्डे (२१), अफरोज खान (२४, सर्व राहणार भंडारा) हे त्याच्या घरासमोर आले. त्याला बाहेर बोलावून जुन्या वादात मारहाण सुरू केली. त्यावेळी आरोपी भय्या व चिंटूने लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यावर लाठीने मारहाण केली. रज्जू हा पळून जात असताना त्याच्यावर दगडाचा मारा करण्यात आला.