प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

व्यापार, शेती व शिक्षण व राजकीयदृष्टया महत्त्वाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या पालांदूर गावाला समस्यांचा घट्ट विळखा बसला आहे. त्यामुळे नागरिकांना कुठे नेऊन ठेवलाय गाव माझे? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

  पालांदूर (Palandur). व्यापार, शेती व शिक्षण व राजकीयदृष्टया महत्त्वाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या पालांदूर गावाला समस्यांचा घट्ट विळखा बसला आहे. त्यामुळे नागरिकांना कुठे नेऊन ठेवलाय गाव माझे? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

  मागील काही वर्षात पालांदूरचे राजकारण एका वेगळ्या वळणावर गेले आहे. पालांदूरची कष्टकरी जनता वारंवार त्याचा अनुभव घेत आहे. पालांदूर येथील कधीही लिलावात न काढलेली बाजार चौकातील मोकळ्या जागेत भरत असलेली मच्छीगुजरीचे स्थलांतरण, गुपचूप ठरावावरून झालेला ऊहापोह तसेच 2008 साली मंजूर झालेली 1 कोटी 25 लाखाची पाणीपुरवठा योजना तब्बल अकरा वर्षानंतर पुर्ण होवूनही या योजनेतून एक थेंब पाणी जनतेला मिळू शकले नाही.

  हे एक पालांदूरवासीयांचे दुर्दैव म्हणावे लागेल. पालांदूरच्या राजकारणाला लागलेले हे एकाधिकारशाहीचे ग्रहण मोडण्यात प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः कुचकामी ठरत आहे. कधीकाळी पालांदूरला निर्मलग्राम पुरस्कार मिळाले होते. गाव स्मार्ट झाल्याचे समाधान जणू काजव्याच्या चमकण्यासारखेच होते. ‘सरपंच नामधारी व उपसरपंच कामकरी’ असाच कारभार आजतागायत पालांदूरात सुरू आहे.

  पालांदूरमधील राजकारण हे कधीकाळी घरच्या भाकरी खाऊन जनसेवा करण्याचे होते. त्यावेळी काही कुरबुरी नव्हत्या असे नाही. बहुतांश वेळी एकमेकांचा आदर, सन्मान करून निवडणुका लढवल्या जायच्या. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद व विधानसभा निवडणुकांच्यावेळी राजकीय वातावरण तापायचे. मात्र, खरेदी-विक्री संघ, विविध सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुका आल्या कधी अन् झाल्या कधी हेच समजायचं नाही. मनभेद होते पण मतभेद नव्हते.

  गेल्या दहा ते पंधरा वर्षात राजकीय वातावरण पूर्णतः बदलून गेले आहे. या गढूळ वातावरणाने पालांदूरच्या जनतेचे आरोग्य हरवून गेले. ही नसती उठाठेव फक्त सत्ता व ठेकेदारी करून मलिदा लाटण्यासाठी होत आहे. गाव नव्हे तर स्वतःला स्मार्ट बनविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. सत्ताधारी, जनतेच्या सेवकांची भूमिका न निभावता स्व:हिताला प्राधान्य देत आहेत. आपण सारे भाऊ अन् मिळून मिसळून खावू याच भूमिकेतून राजकारण व सत्ताकारण सुरू आहे. सत्ता व विरोधी पक्षात हयात असलेले गावनेते व पुढारी कार्यकर्त्यांजवळ गावविकासात कुठे भ्रष्टाचार झाला याबद्दल खासगीत बोलतात. पण गावच्या विकासासाठी जनतेसमोर खुलेआम बोलण्याची हिंमत त्यांच्या अंगात नाही.

  निवडणुकीच्यावेळी मतदारांसमोर आणाभाका घेणारे पुढारी व गावनेते, सत्ता मिळाल्यानंतर आपला तो बाळ्या दुसऱ्याचा तो कार्टा या उक्तीप्रमाणे वागत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या व विरोधकांच्या भूमिकेमुळे आता पालांदूरवासी जनताही अचंबित झाली आहे.

  सामान्य जनता हतबल
  १ कोटी २५ लाखांचा पाणीपुरवठा योजनेतील लेखापरीक्षण अहवालातील त्रुटी, गाळेवाटपात ‘खो’ असे अनेक गैरप्रकार पालांदूरमध्ये झाले आहेत. या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल. राजकारणाच्या या बदललेल्या परिस्थितीला वैतागून सामान्य जनता मात्र हतबल झाली आहे.