डॉ. हिरे, सरपंचासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

याबाबत माहितीनुसार, १० फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी आरोपींनी स्थानिक राऊत कॉम्प्लेक्समधील गाळ्यांचा ताबा मिळवण्यासाठी गुंड प्रवृत्तीचे लोक व अज्ञात महिलांसह पीडित महिलेवर प्राणघातक हल्ला करून अत्याचार व लूटमार करण्याचा प्रकार सर्वांसमक्ष केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

    बुलडाणा. माँ जिजाऊंच्या जिल्ह्यातच महिला सुरक्षित नसल्याच्या घटना घडत आहेत. येथे पीडित महिलेवर अत्याचार व प्राणघातक हल्लाप्रकरणी डॉ. पंजाब हिरे, डॉ. अक्षय हिरे, सुंदरखेडच्या सरपंच अर्पणा चव्हाण, राजेश चव्हाण, मनीष राऊत, विजय काळे यांच्यासह १० आरोपींवर विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशान्वये विविध कलमाखाली शहर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    याबाबत माहितीनुसार, १० फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी आरोपींनी स्थानिक राऊत कॉम्प्लेक्समधील गाळ्यांचा ताबा मिळवण्यासाठी गुंड प्रवृत्तीचे लोक व अज्ञात महिलांसह पीडित महिलेवर प्राणघातक हल्ला करून अत्याचार व लूटमार करण्याचा प्रकार सर्वांसमक्ष केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. तरीही शहर पोलिस स्टेशनने एनसी रिपोर्ट दाखल करून आरोपींना पाठीशी घातल्याचा आदेश दिला. त्यामुळे पीडितेने विविध पुरावे दाखल करत जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली. त्यानुसार २० मार्च २०२१ रोजी एफआयआर दाखल होऊन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते करीत आहेत.

    घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा
    अन्याय, अत्याचार करणाऱ्या घटनेबाबत आरोपींचे मागील एक महिन्यातील कॉल रेकॉर्ड काढून घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आझाद हिंद महिला संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रीय महिला आयोग तथा पोलिस आयुक्तांकडे केली आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यावर सुद्धा अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. आरोपींना अटक न झाल्यास आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. पीडित महिलेच्या वतीने न्यायालयीन कामकाज आझाद हिंद संघटनेचे अॅड. सतीशचंद्र रोठे पाहत आहेत.