गारपिटीने बुलडाणा जिल्ह्यात दाणादाण; फळबाग उत्पादक अडचणीत

अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाले. तसेच नुकताच काढणीवर आलेला कांदा, हरभरा, व गहू पिकाचे नुकसान झाले.

  बुलडाणा. जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे तसेच काही तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे फळबाग उत्पादक अडचणीत सापडले आहेत. महसूल विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. सोमवार २२ मार्चलाही सकाळपासून पाऊस झाला. मात्र, दहा वाजेनंतर पाऊस थांबल्याने लोकांनी सुटकेचा श्वास घेतला.

  अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाले. तसेच नुकताच काढणीवर आलेला कांदा, हरभरा, व गहू पिकाचे नुकसान झाले. ढगाळ वातावरण राहत असल्याने त्याचा परिणाम होत आहे. तसेच गारठा वाढल्याने प्रकृतीच्या तक्रारीही वाढल्या आहेत. २३ मार्चपर्यंत पाऊस होण्याची शक्यता व्यक्त झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

  मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि पाऊस सातत्याने होत आहे. परिपक्व झालेल्या पिकांची त्वरित कापणी करावी व कापणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. साठवणूक करणे शक्य नसल्यास शेतातील शेतमाल प्लास्टिक शिटने झाकून ठेवावा, जेणेकरून अवकाळी पावसापासून शेतमाल खराब होणार नाही, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, बुलडाणा यांनी केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी काळजी घेतली. परंतु ज्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यांना नुकसान सहन करावे लागले.

  गारपीट व पावसामुळे गहू, कांदा, मका, भाजीपाला वर्गीय पिकांचे नुकसान झाले. २० मार्च रोजी तालुक्यातील चिंचपूर, पिंप्री कोरडे, फत्तेपूर भागात गारपीट झाली होती. वरणा भागात मोठ्या प्रमाणात केळी पिकांचे नुकसान झाले आहे. चिंचपूर, पिंप्री कोरडे, फत्तेपूर, विहीरगाव, बोथाकाजी, उमरा अटाळी, बोरी अडगाव, रोहणा, वरणा, ढोरपगाव, सारोळा, शिरजगाव देशमुख या भागासह तालुक्यातील इतरही भागात जोरदार गारपिट झाली होती.

  ‘या’ तालुक्यातील फळबागांना झळ
  बुलडाणा, खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, संग्रामपूर तालुक्यामध्ये फळबागांची संख्या अधिक आहे. शेडनेटसह अन्य आधुनिक तंत्राद्वारे ढोबळी मिरची, फूल शेती, केळी तर काही भागात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी सुद्धा घेतली आहे. चिखली भाग आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. तेथील हापूस आंब्याची सर्वदूर चर्चा व्हायची परंतु बदलत्या वातावरणाचा आंब्यालाही फटका बसला आहे. आता शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.