ट्रकची आणि एसटी बसचा भीषण अपघात; जबरदस्त धडकेत २५ प्रवासी जखमी

सोनाळा-बुलडाणा ही बस सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बुलडाणाकडे येत असताना बुलडाणाकडून येणाऱ्या एका वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली.

    बुलढाणा (Buldhana): एका वाहनाला ओव्हरटेक (overtake a vehicle) करण्याच्या प्रयत्नात ट्रकने एसटी बसला जोरदार धडक दिल्याने अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झालेत ही घटना बुलडाणा-मलकापूर मार्गावरच्या (Buldhana-Malkapur road) मोहेगावजवळ (Mohegaon) घडली. या अपघातात ५ प्रवासी गंभीररीत्या जखमी असून २० प्रवासी किरकोळ जखमी आहेत. या सर्व जखमींवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात (Buldana District General Hospital) उपचार सुरू आहेत.

    सोनाळा-बुलडाणा ही बस सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बुलडाणाकडे येत असताना बुलडाणाकडून येणाऱ्या एका वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या बुलडाण्यातील श्री दत्त चौक मित्र मंडळ या ग्रुपने तात्काळ जखमींची मदत करत त्यांना रुग्णालयात हलवले.

    हा संपूर्ण ग्रुप डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा असल्याने या बसमधील गंभीर झालेल्या वृद्ध महिलेला तात्काळ एका डॉक्टरने जागेवरच सीपीआर दिल्याने सुदैवाने या महिलेचे प्राण वाचले आहेत. श्री दत्त चौक या ग्रुपने सर्व जखमी प्रवाशांना होईल त्या पद्धतीने तात्काळ रुग्णालयात हलवले आहे. या सर्व रुग्णांवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.