बुलडाण्यात स्टेट बँकेवर दरोडा, २० लाखांची रोकड लंपास, महाराष्ट्रात १० दिवसांत ४ बँकांवर दरोडा

दरोड्याची पहिली घटना ही पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे महाराष्ट्र बँकेत 21 ऑक्टोबरला दरोड्याची घटना घडली होती. पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील ......

    बुलढाणा (Buldhana) : दागिने सुरक्षित राहावे म्हणून त्यांनी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेली असतात. पण आता बँकेतसुद्धा आपले दागिने सुरक्षित नाही की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. हा प्रश्न उपस्थित होण्यामागील कारण म्हणजे गेल्या दहा दिवसात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये विविध बँकांवर पडलेला दरोडा. यापैकी दोन दरोडे हे भर दिवसा पडले. तर चौथा दरोडा बुलडाण्यात रात्रीच्यावेळी पडला. चोरांचा बँकेवरील दरोड्याचा प्रकार म्हणजे लुटीचा नवा पॅटर्न आहे की काय? असाही प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे आरोपींना आता पोलिसांचा धाक राहिलेला दिसत नाहीय.

    बुलडाण्यात केळवद येथे स्टेट बँकेवर दरोडा (Robbery at State Bank at Kelwad in Buldana)
    केळवद येथील भारतीय स्‍टेट बँकेवर दरोडा टाकल्याची घटना आज (30 ऑक्टोबर) सकाळी समोर आली आहे. दरोडेखोरांनी बँकेच्या तिजोरीतून 20 लाखांची रोकड लंपास केली आहे. बँकेच्या शिपाईने बँक उघडल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आणि पोलिसांना याची तात्काळ माहिती दिली. यामुळे मात्र बुलडाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

    नेमकं काय घडलं? (What exactly happened?)
    बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्‍टेट बँकेच्‍या शाखेवर मध्यरात्री दरोडा पडल्याची घटना घडली. सकाळी शिपाई बँकेत आल्यानंतर बँकेत दरोडा पडल्याची माहिती समोर आली. दरोडेखोरांनी जवळपास 20 लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. दरोड्याची माहिती मिळताच बुलडाणा येथून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले. पोलीस श्वानपथकाद्वारे दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

    चोरांनी बँकेवर दरोडा कसा टाकला? (How did the thieves rob the bank?)
    दरोडेखोर बँकेच्या इमारतीचे खिडकीचे गज वाकवून बँकेत शिरले आणि त्यांनी बँकेतील तिजोरी गॅस कटरने कापून रोकड पळविली. जेव्हा सकाळी शिपाई बँकेत आला तेव्‍हा खिडकीचे गज वाकवले गेल्याचे पाहून त्‍याला चोरीचा संशय आला. त्‍याने ही बाब बँकेच्या अधिकाऱ्यांना कळवली. अधिकाऱ्यांनी बँकेत येत पाहणी करुन तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत तपासाला सुरुवात केली. यावेळी श्वान पथकाने बँकेच्‍या बाजूच्‍या शेतापर्यंत माग घेतला तेव्हा तिथे दरोडेखोरांचे हँडग्‍लोज आणि बॅटरी मिळून आली. दरम्यान, सीसीटीव्‍हीत दोन दरोडेखोर कैद झाल्याची शक्‍यता आहे. तर या घटनेमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय.

    महाराष्ट्रात दहा दिवसांत चार बँकांमध्ये दरोडा (Robbery in four banks in Maharashtra in ten days)
    दरोड्याची पहिली घटना ही पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे महाराष्ट्र बँकेत 21 ऑक्टोबरला दरोड्याची घटना घडली होती. पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील 31 लाख रुपये रोकड तसेच 2 कोटी रुपयांचे सोने पळवून नेले होते.

    बँकेवरील दरोड्याची दुसरी घटना ही जालना जिल्ह्यातून समोर आली होती. जालनाच्या अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलडाणा अर्बन बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडला होता. आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँकेतील पैसे आणि लॉकरमधील दागिने लंपास केले होते. संबंधित घटना ही 28 ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास घडली होती. तीन बंदूकधारे बँकेत शिरले. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत 25 लाख रुपये आणि मोठ्या प्रमाणावर लॉकरमधील सोने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

    तिसरी घटना ही काल (29 ऑक्टोबर) सोलापुरात घडली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये सात लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. गॅस कटरच्या सहाय्याने दरवाजा तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे. तर तिसरी घटना ही आज सकाळी बुलडाण्यात स्टेट बँकेत घडलीय.