तमिळनाडूत मृत महिलेला ‘कोविड लस’ दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; सर्टिफिकेट देखील डाउनलोड

    सिंदखेड राजा (Sindkhed Raja) : शहरातील एका मृत महिलेला तमिळनाडूत कोविड लस दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या मृत महिलेला लस दिल्याचे सर्टिफिकेटदेखील डाउनलोड झाले आहे. या प्रकारामुळे मृत महिलेचे नातेवाईक गोंधळून गेले आहेत. सखूबाई गोपाळ बरडे (७५) यांचे १७ एप्रिल रोजी निधन झाले. शहरातील आढाव गल्लीत राहणाऱ्या या कुटुंबात मृत महिलेचे पती गोपाळराव, मुलगा राजेश व परिवार आहे.

    रम्यान, राजेश बरडे यांच्या मोबाइलवर मंगळवारी, २ नोव्हेंबर रोजी एक मेसेज आला. सखूबाई बरडे यांनी कोविशिल्ड लरसीचा पहिला डोस घेतल्याचा तो संदेश होता. सखूबाई यांचा मुलगा राजेश याने मेसेजमधील लिंकवर जाऊन सर्टिफिकेट डाऊनलोड केले असता, तमिळनाडू राज्यातील सर्टिफिकेट आले. तमिळनाडू राज्यातील येन्नमंगलम् पीएचसी, यरोडे येथील लसीकरण केंद्रावर सखूबाईंचे २६ ऑक्टोबर २०२१ रोजी लसीकरण झाल्याचा त्यात उल्लेख आहे. तमिळ आणि इंग्रजीत असलेले हे सर्टिफिकेट बघून सखूबाई यांच्या नातेवाइकांना धक्का बसला. महाराष्ट्रात निधन झालेल्या महिलेचे नाव तमिळनाडूत कसे गेले, त्यांना तेथे लस दिली गेली, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या प्रकरणाने शतकोटी लसीकरण पूर्ण करणार्या भारतातील लसीकरणाचा गोंधळ निदर्शनास येतो.

    तमिळनाडू कधीच पाहिले नाही
    माझ्या आईचं निधन होऊन जवळपास सात महिने झाले. मी किंवा माझ्या परिवारातील कोणीच तमिळनाडू पाहिलेला नाही. असे असताना तिथं माझ्या मृत आईच्या नावाची नोंद होते. लसीकरण होते, त्यावर आधार कार्ड नंबर दिला जातो. लसीकरण झाल्याचा मेसेज मात्र महाराष्ट्रातील माझ्या नंबरवर येतो, हा प्रकार डोके चक्रावून टाकणारा असल्याची प्रतिक्रिया राजेश बरडे यांनी दिली. नेमका प्रकार काय? : या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा राजेश बरडे यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. सांगळे यांच्याशी संपर्क साधला असता तूर्तास आपण बोलू शकत नाही, असा मेसेज त्यांनी पाठवला.