ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण; ढासाळवाडी, हनवतखेड गावांना टँकर मंजूर

बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड व ढासाळवाडी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. हनवतखेड येथील लोकसंख्या 397 असून ढासाळवाडी येथील 1130 आहे.

  बुलडाणा (Buldana).  तालुक्यातील हनवतखेड व ढासाळवाडी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. हनवतखेड येथील लोकसंख्या 397 असून ढासाळवाडी येथील 1130 आहे. टँकरद्वारे दररोज ढासाळवाडीला 50 हजार 600 लिटर, हनवतखेडला 12 हजार 320 लिटर पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे.

  पाणीटंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणीपुरवठ्याची साधने, स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेऊन टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांनी कळवले आहे.

  टँकरग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता
  यावेळी जिल्ह्याच्या विविध भागातून पाण्याच्या टँकरची मागणी होत आहे. बुलडाणा तालुक्यासह जवळच्या तालुक्यातही प्रशासनाने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आहे. तसेच यावेळचा उन्हाळा लक्षात घेऊन टँकरची संख्या वाढणार असल्याचे चित्र आहे. टंचाई आराखड्यानुसार टंचाई भासत असलेल्या गावांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु ज्या गावांमध्ये टँकर सुरू आहेत तेथील लोकांनी पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

  ग्रामपंचायतींनी लॉगबुक मेंटेन करावे
  ज्या गावांमध्ये पाण्याचे टँकर पाठवण्यात येत आहेत तेथील ग्राम पंचायतींनी टँकरच्या फेऱ्याविषयी दररोज माहिती संकलित करावी आणि ती प्रशासनाला पाठवावी. जेणेकरून याबाबत पारदर्शकता राहील. या संदर्भात काहीही अडचण असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. चुकीची कामे कोठेही दिसता कामा नये, असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.