कॅन्सरविषयक जनजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय वेबिनार

  • १० देशातील १५०० विद्यार्थ्यांसह प्राध्यापक सहभागी

बल्लारपूर. शहरातील गुरू नानक विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी पर्वावर सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्यावतीने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वेबिनार नुकताच पार पडला. कॅन्सरविषयक जनजागृती व्हावी, कॅन्सरग्रस्तांमधील भीती दूर व्हावी, या उद्देशाने आयोजन करण्यात आले.  ‘मेटॅबोलोमिक्स ऑफ कॅन्सर’ हा वेबिनारचा मुख्य विषय होता. संस्थाध्यक्ष सरदार नागिंदरसिंह सोनी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार पडलेल्या वेबिनारमधे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एम. बहिरवार होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. मौरो मासिएरो, इ.टी.एच. झुरीच (स्वित्झर्लंड) आणि डॉ. वेन वुतेय (रॉयल अॅग्रिकल्चरल युनि .कंबोडिया) उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मासिएरो म्हणाले, शरीरातील पेशींमधल्या रासायनिक पदार्थात कॅन्सरची उत्पत्ती होते. त्यावर निदान करण्यासाठी मेटाबेलो मिक्सच्या माध्यामातून उपचार करण्यास मदत होते. याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्या जाते. या प्रक्रियेमुळे कॅन्सरवर मात करणे शक्य होते. जागतिक क्रमवारीत उच्च दर्जाच्या विद्यापीठात कार्यरत असलेले डॉ. झुरीच आणि डॉ. बुतेन यांनी प्राण्यात उच्च दर्जाची रोगप्रतिकार क्षमता कशी निर्माण होते, याबद्दलची विशेष माहिती दिली. तसेच विशिष्ट धातुंच्या संयुगाचा (मेटल कॉम्प्लेक्स) वापर करून कॅन्सरवर मात करता येते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा, विज्ञान युगाचा स्वीकार करणे गरजेचे आहे. कॅन्सरविषयी अवास्तव भिती बाळगू नये, असेही ते म्हणाले.

या उपक्रमात सहभागी इतर प्राध्यापकांनीही कॅन्सरविषयक माहिती दिली. अतिथी वक्त्यांचा परिचय डॉ.के.एन. सहारे आणि प्रा.जी.एस. घुगरे यांनी करून दिला. संचालन वेबिनारचे संयोजक डॉ. प्रफुल्ल काटकर यांनी केले. तांत्रिक नियोजन डॉ. दिनेश देशमुख आणि डॉ. निलेश जाधव यांनी केले. आभार डॉ. निलेश जाधव यांनी मानले.
कॅन्सरग्रस्तांना आणि या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्राध्यापक आणि इतर संस्थांना या वेबिनारचा फायदा निश्चितच होईल, अशी आशा डॉ.बी.एम. बहिरवार यांनी व्यक्त केली.