आकाशातील वीज युवकाच्या डोक्यावर कोसळली; कामाच्या पहिल्याच दिवशी मृत्यूने गाठले

    चंद्रपूर (Chandrapur) : बस स्थानक तसेच जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोर असलेल्या महसूल भवनाच्या छतावर केबलचे काम करत असलेल्या एका १९ वर्षीय युवकावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरच्या महसूल भवनाच्या छतावर अनिकेत हरीष चांदेकर हा युवक सी सी टीव्ही केबल टाकण्याचे काम करायला गेला होता. दरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरू झाला. काही कळायच्या आत महसूल भवनावर काम करत असलेल्या अनिकेतच्या डोक्यावरच वीज कोसळली.

    या आघाताने त्याच्या डोक्यावर जखम झाली होती व त्याचा मोबाईल सुद्धा फुटला होता. अनिकेत हा आपल्या काकांसोबत जुनोना चौक, बाबुपेठ येथे काही दिवसांपासून राहत होता. आजचा त्याच्या कामाचा पाहिलाच दिवस होता हे विशेष!

    ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी छतावर धाव घेतली. या नागरिकांनी जखमी अवस्थेतील अनिकेतला तत्काळ दवाखान्यात पाठविले. मात्र, दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.