माणिकगड कंपनीचे डस्ट प्रदूषण; महिलांनी केली नगरपरिषदेकडे ठरावाची मागणी

गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनीतून निघणा-या डस्ट प्रदूषणामुळे साईशांती नगरातील जनता हैराण झाली आहे. कित्येकदा निवेदने व निषेध आंदोलनेही काढण्यात आली.

    गडचांदूर (Gadchandur).  माणिकगड सिमेंट कंपनीतून निघणा-या डस्ट प्रदूषणामुळे साईशांती नगरातील जनता हैराण झाली आहे. कित्येकदा निवेदने व निषेध आंदोलनेही काढण्यात आली. नगराध्यक्ष व सत्ताधारी लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत आहे. मागील तीन महिन्या पूर्वी माणिकगड सिमेंट कंपनीकडून मोठ्या प्रमाणात डस्ट प्रदूषण होत असल्याबाबत ठराव घेण्याबाबत निवेदन दिले. परंतु जनतेच्या निवेदनाला केराची टोपली दाखविली.

    मागील सभेत विषय घेतला नाही. त्यामुळे आम्ही सर्व साईशांती नगरातील महिलांनी आज परत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, उपाध्यक्ष तथा सर्व विभागाचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका यांना निवेदन देऊन होत असलेले डस्ट प्रदूषणा बाबतचा ठराव विषय सूचित घ्या व बहुमताने ठराव मंजूर करा अन्यथा आम्ही सभेच्या दिवशी नगर परिषदच्या समोर बसून आंदोलन करू अशा प्रकारचे निवेदन दिले आहे.

    सदरचे निवेदन देण्यास गेले असता नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष हजर नव्हते व मुख्याधिकारी यांनी सकारात्मक उत्तर देत येणा-या सभेत विषय ठेवते आपण नगराध्यक्ष यांना भेटा असे उत्तर दिले. या सभेत विषय ठेवला नाही वा ठराव मंजूर करण्यास टाळाटाळ केल्यास आम्ही नगर परिषद समोर आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

    यावेळी साईशांती नगरातील रहिवासी माजी नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे, लताताई ठावरी, मनीषा इसनकर, कल्पना जोगी, शारदा क्षीरसागर, प्रभा पाणघाटे, माधुरी रासेकर, प्रीती मिननेवार, सुवर्णा कावटकर , वैशाली पोतनूरवार, आशा आत्राम, रिना अलोने, वर्षा आत्राम, अनुसया गायकवाड, शालू टोंगे इत्यादी महिला उपस्थित होत्या. आता तरी डस्ट प्रदूषणाचा ठराव नगर परिषदच्या सभेत घेईल की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.