माणिकगड कंपनीच्या धुळीने साई शांती नगरवासीय त्रस्त; धुळीने कठीण केले जगणे

कोरपना येथे मागील एक ते दीड महिन्यांपासून माणिकगड सिमेंट कंपनीच्याविरोधात साईशांती नगरातील नागरिक धूरीच्या प्रदूषणाबाबत त्रस्त झाले आहे. वारंवार निवेदने देऊनही कोणतीच दखल न घेतल्याने आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे.

    कोरपना (Corpana).  मागील एक ते दीड महिन्यांपासून माणिकगड सिमेंट कंपनीच्याविरोधात साईशांती नगरातील नागरिक धूरीच्या प्रदूषणाबाबत त्रस्त झाले आहे. वारंवार निवेदने देऊनही कोणतीच दखल न घेतल्याने आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे. यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला.

    नगरसेवक अरविंद डोहे व साईशांती नगरवासीतर्फे कंपनी प्रदूषणाच्याविरोधात निषेध मोर्चा काढला. तसेच स्थानिक प्रदूषणाविरुद्ध निषेध मोर्चा काढून गडचांदूर येथील राजीव गांधी चौकात पुरुष, युवक, महिलांनी घोषणाबाजी केली. यात मोठ्या संख्येनी नागरिक सामिल झाले होते. कंपनीतून मोठ्या प्रमाणात धूळीच्या बाहेर पडत असून तो सरळ साईशांती कॉलनीमध्ये जमा होत आहे. सकाळी उठून घराबाहेर असलेले कपडे किंवा वस्तू पूर्णपणे धुळीने माखलेली असते. तेव्हा साईशांती नगरवासियांचे रोजच्या धूळीने जगने मुश्कील झाले आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाला वेळीवेळी निवेदने सोपवून लक्ष वेधले. परंतु कोणतीही दखल न घेतल्याने अखेरीस नागरिक रस्त्यावर उतरले.

    यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष सतीश उपलेंचीवार तसेच शिवसेना नगरसेवक सागर ठाकूरवार यांनीसुद्धा साईशांती नगरवासी सोबत असल्याचे सांगून पाठिंबा दर्शविला आहे. नगरसेवक अरविंद डोहे, निलेश ताजने, न्यूतेश डाखरे, रवींद्र चौथाले, महेंद्र ताकसांडे, माजी नगराध्यक्ष डोहे, माधुरी ठावरी, स्मिता पिदूरकर यांनी सदरचा निषेध हा शासन प्रशासनाचे धुळीचे प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी आहे. येत्या काही दिवसात सदर कंपनी विरुद्ध कारवाई करून प्रदूषण बंद न केल्यास मोठे आंदोलन करू, असा सूचक इशारा दिला. आता या माणिकगड सिमेंट कंपनी विरुद्ध शासन प्रशासन काय कारवाई करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    समाज माध्यामांमधूनही नोंदविला निषेध
    धुरीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी कंपनीचा निषेध म्हणून आपल्या घरावर काळे झेंडे लावले. तसेच दारावर माणिकगड सिमेंट कंपनीचे निषेध बॅनर झळकावले. मुख्य रस्त्यावर माणिकगड सिमेंट कंपनीच्या सौजन्याने प्रदूषित शहरात आपले सहर्ष स्वागत असे उपरोधिक बॅनर लावले. सोशल माध्यमावरूनही सर्व महिला पुरुष, युवकांनी निषेध नोंदवून कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधले.