
महिला पोलीस असतांना पुरूष पोलिस निरीक्षकाने व शिपायाने स्वत: मारहाण का केली ? असा प्रश्न नगरसेविका शारदा गरपल्लीवार यांनी उपस्थित केला आहे. वृद्ध महिलेचा अपमान करणा-या पोलिस निरिक्षक जीवनदास राजगुरू यांचेवर कारवाई करा, अशी मागणी गरपल्लीवार यांनी केली आहे.
चंद्रपूर : गोंडपीपरी येथील ६० वर्षीय वयोवृद्ध महिला जिजाबाई वामन तुमडे, यांचावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी पोलिस स्टेशनला गेल्या असता पोलिस निरीक्षक जीवनदास राजगुरू यांनी जिजाबाईच्या कानशिलात लगावली. दरम्यान अर्वाच्य शिवीगाळ करीत शिपायाला त्यांना पट्ट्याने मारण्याचे आदेश दिले. त्यानंतर शिपायानेही मारहाण केले. वृध्द महिलेला मारहाण करणा-या त्या पोलिस निरीक्षकावर कठोर कारवाई करून पीडित वृद्धेला न्याय द्यावा अशी मागणी नगरसेविका शारदा गरपल्लीवार यांनी आज १५ मार्च रोजी पत्रपरिषदेतून केली.
शेजारी राहणा-या नयन तुमंडे व अनुसया तुमंडे यांच्याशी जिजाबाईचा जुना वाद आहे. नयनने वाद उकरून काढून जिजाबाईच्या मुलीला (अल्का ) मारहाण केली. सदर प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आली. तेव्हा पोलीसांनी नयन तुमडे विरुद्ध गुन्हा नोंदविला. सदर प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ट असतांना नयन तुमडे, अनुसया तुमडे यांनी जिजाबाईच्या घरी येऊन भांडण करून तक्रार परत घ्या असा तगादा लावला. तसेच, त्यांना धमकी दिली.
सदरची तक्रार जिजाबाईनी गोंडपिपरी पोलिसांत केली. तेव्हा तक्रारीची दखल न घेता नयन तूमडे व अनुसया तुमडे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करीत, तू माजली आहेस थांब ! तुझी चरबी उतरवतो, असे अपमानास्पद बोलून जिजाबाईच्या कानावर व गालावर थप्पड मारली. नंतर पट्ट्याने मारण्याचे आदेश दिले. जिजाबाईच्या म्हणण्यानुसार पट्ट्याने मारण्याचा आदेश दिल्याने शिपायाने पायावर व मांडीवर मारले. महिला पोलीस असतांना पुरूष पोलिस निरीक्षकाने व शिपायाने स्वत: मारहाण का केली ? असा प्रश्न नगरसेविका शारदा गरपल्लीवार यांनी उपस्थित केला आहे. वृद्ध महिलेचा अपमान करणा-या पोलिस निरिक्षक जीवनदास राजगुरू यांचेवर कारवाई करा, अशी मागणी गरपल्लीवार यांनी केली आहे. पत्रपरिषदेत पीडित वृद्ध महिला जिजाबाई तुमडे, मुलगा गणेश तुमडे व खेमचंद गरपल्लीवार यांची उपस्थिती होती.
पोलिस अधीक्षकांनी घेतली दखल
पत्रपरिषदेनंतर पीडित जिजाबाई व नगरसेविका शारदा गरपल्लीवार यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना तक्रार सादर केली. याची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश एसडीपीओ मूल यांना दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.