प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

ब्रह्मपुरी येथे 2019-20 या एक वर्षातील मासेमारी तलावाचा ठेका निःशुल्क मुदतवाढ करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मत्स्यपालन लिजधारकांना चालू वित्तीय वर्षाकरिता मुदतवाढ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

    ब्रह्मपुरी (Brahmapuri).  2019-20 या एक वर्षातील मासेमारी तलावाचा ठेका निःशुल्क मुदतवाढ करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मत्स्यपालन लिजधारकांना चालू वित्तीय वर्षाकरिता मुदतवाढ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत तालुक्यातील सर्व मत्स्यपालन सहकारी संस्थांनी सन 2019-20 या वर्षात भरलेली ठेका रक्कम सन 2020-21 या वर्षात वळती करण्यात येणार आहे.

    कोविड -19 चा प्रादुर्भाव जिल्ह्यात रोखण्यासाठी तसेच जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांनी मासेमारी बंद ठेवली होती, तसेच मच्छिमार घराबाहेर पडू न शकल्याने तलावातील माशांची मोठ्या प्रमाणात चोरी सुद्धा झाली होती. त्यामुळे संस्थेचे व सभासदांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. त्यावेळी मासेमारी करण्यात आली परंतु समाधानकारक मासेमारी झाली नाही.  नंतर पावसाळा सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात तलावांमध्ये पाणी साचल्याने अपेक्षित मासेमारी करता आली नाही, यासंबंधी मासेमारी संस्थांनी संघालासुद्धा कळविले होते. याबाबत संबंधित विभागाला निवेदनसुद्धा देण्यात आले होते.

    मच्छिमार संस्थेच्या निवेदनाची दखल घेत चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य क्रिष्णा सहारे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी प्रत्यक्ष चर्चा करून मासेमारी संस्थांची आपबीत्ती सांगितली. 31 मार्चपूर्वी तलावाची ठेका रक्कम भरण्याची मुदत असल्याने 31 मार्चपूर्वीच ठेक्याच्या रकमेचा भरणा केला होता, तसेच 2019-20 या एक वर्षातील मासेमारी तलावाचा ठेका निःशुल्क मुदतवाढ करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मत्स्यपालन लिजधारकांना चालू वित्तीय वर्षाकरिता मुदतवाढ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेतली. असे परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य क्रिष्णा सहारे यांनी सांगितले.