डॉ. शीतल आमटे आत्महत्येचे गूढ कायम; ‘सेंट्रल फॉरेन्सिक’ घेणार टॅबच्या आय पासवर्डचा शोध

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली होती. डॉ. शीतल यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात मुंबई पोलिसांच्या सायबरतज्ज्ञांना अपयश आले आहे. शीतल यांच्या टॅबला आय पासवर्ड आहे.

  चंद्रपूर. वरोरा येथील महारोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता चार महिने उलटून गेले आहेत. मात्र, या प्रकरणाच्या तपासणीत अद्यापही प्रगती होत नसल्याचे दिसून येत आहे. डॉ. शीतल आमटे यांच्या टॅबचा आय पासवर्ड शोधण्यात मुंबई पोलिसांच्या सायबरतज्ज्ञांना अपयश आले आहे. हा पासवर्ड शोधण्याची जबाबदारी आता पुण्यातील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लेबॉरटरीकडे सोपवण्यात आली आहे.

  पासवर्ड मिळाल्यानंतरच सत्य समोर येणार  
  ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली होती. डॉ. शीतल यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात मुंबई पोलिसांच्या सायबरतज्ज्ञांना अपयश आले आहे. शीतल यांच्या टॅबला आय पासवर्ड आहे. तो शोधण्यात पोलिसांना अपयश आल्याने ही जबाबदारी पुण्यातील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लेबॉरटरीकडे देण्यात आली आहे. डॉ. शीतल यांच्या लॅपटॉप आणि 2 मोबाईलचा पूर्ण डेटा अद्याप रिकव्हर झाला नसल्याची शंका चंद्रपूर पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे डॉ. शीतल यांचे 2 मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब हे सर्व सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लेबॉरटरीकडे देण्यात आले आहेत. या इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या मदतीनेच डॉ. शीतल यांच्या आत्महत्येमागील कारणांवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

  गौतम करजगीदेखील अनभिज्ञ
  डॉ. शीतल यांनी त्यांच्या या गॅझेट्सचे पासवर्ड नुकतेच बदलविले होते. विशेष म्हणजे या हे बदललेल्या पासवर्डबद्दल त्यांचे पती गौतम करजगी यांनादेखील कल्पना नाही. यातील काही गॅझेट्सना सॉफ्टवेअर लॉक आहे, तर काही गॅझेट्सना त्यांनी स्वत:च्या डोळ्यांचे पासवर्ड ठेवले होते. त्यामुळे ताब्यात घेतलेला टॅब, लॅपटॉप, आणि मोबाईल उघडण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. परिणामी तपास करण्यास, त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण शोधण्यास अडचणी येत आहेत. हे सर्व गॅझेट्स नागपूरच्या फॅरेन्सिक पथकाने मुंबईतील आयटी तज्ज्ञांकडे पाठवले होते. मात्र मुंबई पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांना अपयश आले.

   विष अत्यंत घातक
  शीतल आमटे यांनी आत्महत्येसाठी वापरलेली काही इंजेक्शन्स त्यांच्या कक्षात आढळून आली आहेत. शीतल यांनी आत्महत्येसाठी नेमके कोणते विषारी रसायन वापरले, याचा तपास पोलिस करत आहेत. याबाबतचा रासायनिक अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे. डॉ. शीतल यांनी आत्महत्यासाठी वापरलेले विष हे अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे असल्याची सूत्रांची माहिती आहे. हे विष त्यांनी कुठून मिळवले, याचाही तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.